छे छे...!!! हिप्नोटाईज वगैरे काही नव्हतं, ही तर देवीच्या नावावर केलेली भोंदूगिरी, हातचलाखी आणि शुद्ध फसवणूक

मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क

इंदापूर (२९ ऑगस्ट) :- जोगवा मागण्याच्या बहाण्याने दिपाली लक्ष्मण खरात या गृहिणीला लुबाडल्याची घटना २३ ऑगस्ट रोजी इंदापूर शहराच्या राजेवलीनगर भागात घडली होती. या संदर्भात इंदापूर शहरात मागील दोन दिवसांपासून वेगवेगळ्या चर्चांना चांगलंच उधाण आलं होतं. या संदर्भात सीसीटिव्ही फुटेजही सोशल मीडियावर चांगलेच वायरल होत आहेत. ही घटना आणि या घटनेच्या चर्चांचं केंद्र ठरली होती ती हिप्नोटाईज करून लुबाडण्यात आल्याची बाब. परंतु ते हिप्नोटाईज वगैरे काही नव्हतं, तर देवीच्या नावावर केलेली भोंदूगिरी, हातचलाखी आणि शुद्ध फसवणूक होती हे खुद्द दिपाली खरात यांच्या फिर्यादीवरून आता स्पष्ट झालं आहे. आरोपी महिला माया सागर साळुंखे (रा. ५८ फाटा, माळशिरस, जि. सोलापूर) हिला सोमवारी (२८ ऑगस्ट) इंदापूर अकलूज ब्रीजनजीक पकडुन पोलिसांच्या हवाली केल्यानंतर खरात यांनी सविस्तर माहिती इंदापूर पोलिसांना दिली आहे. ही माहिती जाणून घेणं खूप गरजेचं आहे. जेणेकरून अशा पद्धतीने कोणाचीही फसवणूक होऊ नये.

फिर्यादी यांनी पोलिसांना दिलेली माहिती आम्ही वाचकांसमोर आहे अशी देत आहोत...

२३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आमच्या घराचा दरवाजा वाजल्याने मी दरवाजा उघडला. एक अनोळखी महिला हातात देवीची परडी घेऊन उभी होती. तिने सोनेरी काठ असलेली हिरव्या रंगाची साडी घातली होती. अंगावर केशरी रंगाची शॉल पांघरली होती. तिच्या काखेत कवडी लावलेली पांटरी कापडी बॅग होती. तिच्या गळ्यात पांढऱ्या रंगाच्या कवड्याच्या माळा होत्या. तिचा चेहरा उभट होता. तिने कपाळावर हळदी कुंकवाचा मळवट भरला होता. तिने हातात हिरव्या बांगड्या घातल्या होत्या. तिने जोगवा मागितल्याने मी जोगवा देण्यासाठी घरातून पिठ, तेल व हळद कुंकू घेऊन गेले. त्या महिलेने मला जोगवा नको, तुझ्या हातचा एक कप चहा पाहिजे असे म्हणाल्याने त्या महिलेला मी आमचे घराच्या दरवाजामध्ये बसविले व चहा बनविण्यासाठी मी किचनमध्ये गेले. तेव्हा त्या महिलेने मला आवाज देऊन बोलावून घेतले. ती मला एक प्लेट तांदुळ व अगरबती दे असे म्हणाली. मी तिला एक प्लेट तांदुळ व अगरबती दिली. तेव्हा तिने मला तिचे जवळ बसण्यासाठी सांगितले. मी तिच्या जवळ बसले. तिने मला "मी देवीचे रुप घेऊन आले आहे, तु मला ओळखले नाही, मी तुझे सत्व व मन बघण्यासाठी आले" असल्याचे म्हटले.

क्लिक करा - जोगवा मागायला आली आणि लुबाडून गेली

त्या महिलेने तिच्याकडील तांदुळ, साखर, हळदी-कुंकू सर्व एका कागदाच्या पुडीत बांधून माझ्याकडे दिली व मला म्हणाली, ही पुडी हातात घेऊन तू घरातील देवाच्या पाया पडून ये. देवी तुला सुख देती, का दुख देती हे मी दिलेली पुडी उघडुन पहा. ती पुडी घेऊन मी घरातील देवाच्या पाया पडून परत त्या महिलेच्या जवळ येऊन तिने दिलेली पुडी उघडून पाहिली. तर त्या पुडीमध्ये दोन पिवळ्या रंगाची झेंडूची फुले निघाली. तेव्हा त्या महिलेने मला अजून देवी तुझे सत्व आणि मन पाहणार आहे असे सांगून माझ्याकडे ५ तुळशीची पाने मागितली. तेव्हा मी तिला ५ तुळशीची पाने आणून दिली. त्या महिलेने ती तुळशीची पाने तिच्या हाताच्या पाचही बोटामध्ये पकडली व मला हात पुढे करण्यासाठी सांगून तिने देवीचे नाव घेतले. त्यावेळी तिच्या हातातून माझ्या हातात एक हिरव्या रंगाची काचेची बांगडी पडली. तेव्हा ती मला म्हणाली, आता तुझी सर्व कामे होतील.

क्लिक करा - हिप्नो टाईज करून लुबाडणारी महिला जेरबंद; मुत्सुद्देगिरीच्या बातमीचा इंम्पॅक्ट

तदनंतर तिने देवी तुझे अजून सत्व आणि मन बघणार असल्याचे सांगत माझ्याकडे एक नवी साडी मागितली. तेव्हा मी घरातील एक नवी साडी तिला दिली. तिने मला देवी तुझे आणखी सत्व आणि मन बघणार आहे, देवी तुला अजून देऊन जाणार आहे, असे सांगून माझ्याकडे धने मागितले. तेव्हा मी घरातील धने आणून त्या महिलेला दिले. तेव्हा तीने ते धने तिच्या हातातील बोटांमध्ये पकडून मला हात पुढे करायला सांगितला. तेव्हा त्या महिलेच्या हातातून दोन रुपयाचे दोन नाणे व एक रुपयाचे एक नाणे, तसेच पांढऱ्या रंगाची कवडी माझ्या हातावर पडली. मला देवीला अभिषेक घालण्यासाठी काळ्या गाईचे तुप लागेल, ते तुप खूप महाग असून, तुप घेण्यासाठी मला पैसे दे असे ती म्हणाली. मी स्वखुशीने माझ्याकडील दीड हजार रुपये त्या महिलेला दिले. तेव्हा त्या महिलेने "देवीला सोन्याचे डोळे करावे लागतील" तरच तुझी कामे होतील असे सांगून मला नवऱ्याने दिलेले सोन्याचे दागिने घेऊन येण्यास सांगितले.

मी माझ्या नवऱ्याने दिलेल्या दागिन्यांपैकी ३ ग्रॅम २०० मिली वजनाची सोन्याची अंगठी व ३ ग्रॅम ५६० मिली वजनाचे कानातील जोड त्या महिलेला आणून दिले. तेव्हा ते सोन्याचे दागिने त्या महिलेने तिचेकडील कागदावर ठेऊन त्याची पुढी बांधली व ती पुडी मला देवघरात ठेवण्यास सांगून ती निघून गेली. तिने पुढील तीन दिवस पुढी उघडण्याची आणि ही गोष्ट कोणालाही न सांगण्याची ताकीद केली होती. तिसऱ्या दिवशी ही पुडी उघडल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे खरात यांच्या लक्षात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट