फ्रॉड - दाम दुपटीच्या आमिषाने इंदापूरच्या तरुणाला साडे चोवीस लाखांना गंडवले
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क
इंदापूर (८ ऑगस्ट) :- झटपट श्रीमंत होण्याची आशा आणि कष्टाविना, कमी वेळेत जास्त परतावा मिळवण्याची हौस किती महागात पडू शकते याचा बोध देणारी घटना नुकतीच समोर आली. संजय अंकुश ठावरे (वय ३४ वर्ष, रा. ठवरेवस्ती, इंदापूर) या तरुणाला दाम दुपटीचे आमिष दाखवून पुण्यातील सहा जणांच्या टोळीने तब्बल २४ लाख ५२ हजारांचा चुना लावला. या संदर्भात अमोल भोजगुडे, शाम सुकने, सुषमा महेश गायकवाड, आकाश खिलारे, रेणुका अविनाश जावळे आणि महेश जीवनराव कोकणे या सहा जणांवर इंदापूर पोलीस ठाण्यात भा.द.वि. ४२० कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा तरुण फेसबुकवर "सुषमा गायकवाड" नावाच्या अकाउंटवरून "गोल्डन बुल्स ॲकॅडमी" या कंपनीच्या गुंतवणुकीबाबत जाहिरात पाहून आरोपींच्या संपर्कात आला. रकमेवर दरमहा ५% परतावा, १२ महिन्यानंतर दाम दुप्पट, रक्कम नको असल्यास पुण्यात २ बीएचके फ्लॅट देण्याचे आमिष आरोपींकडून या फसलेल्या तरुणाला देण्यात आले होते. मात्र यासाठी किमान ३० लाखांची गुंतवणूक करण्याची अट तरुणाला घालण्यात आली होती. विश्वास संपादन करण्यासाठी फिर्यादीला हडपसर येथील मगरपट्टा सिटी आणि ॲमेनोरा टॉवर येथील कार्यालयही दाखवण्यात आले. विना मेहनत दाम दुपटीची आशा, आरोपींचे प्रभावी संभाषण, शहरात कंपनीचे मोठे कार्यालय आणि कार्यालयात कॉम्पुटरवर काम करणारे ५० पेक्षा जास्त एम्प्लॉई पाहून भाळलेला तरुण आरोपींच्या जाळ्यात सहज अडकला. या तरुणाने मागील १ वर्षाच्या कालावधीत वेगवेगळ्या माध्यमातून रोख रकमेसह आरोपींना तब्बल साडे चोवीस लाख रु. दिले आहेत.
तरुणाच्या दोन्ही भावंडांचा अपघात झाल्याने, तसेच व्यवसायकामी पैशांची गरज भासल्याने फिर्यादीने आरोपींकडे पैशांची मागणी केली. मात्र "चोर त्यात सव्वा मन जोर" असलेल्या आरोपींनी तरुणाकडे आधी पैसे गुंतवल्याचे पुरावे मागितले. मग थेट नकार देत फिर्यादीला दमदाटी केली. अक्कल खाती जमा, अर्थात फसल्याची जाणीव झालेल्या फिर्यादीने इंदापूर पोलीस ठाणे गाठले. आता सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने अधिक तपास करत आहेत. प्रामाणिक लाकूडतोड्याच्या गोष्टीतून मेहनत आणि प्रामाणिकपणा माणसाला बरंच काही देऊन जातो हेच आपण शिकलो. जीवनात यशस्वी होण्यासाठी अनेक उपाय आहेत, फक्त योग्य उपाय आचरणात आणले पाहिजेत. जीवनात पैसा बँक बॅलन्स, मालमत्ता म्हणजेच यशस्वी होणे हा समजही खोटा असून, शॉर्ट कटचा मार्ग नेहमीच धोकादायक आणि पश्चातापजनक ठरतो हाच बोध या घटनेतून मिळत आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा