आरोपीच्या मनात धगधगत असलेला राग ११ वर्षानंतर उफाळून आला आणि नको ते घडलं; कोयत्याने वार करून चुलत भावाला कोरड्या विहिरीत ढकललं

वालचंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; आरोपीला अटक

मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क

कळंब (२४ ऑगस्ट) :- सं म्हणतात की, "राग ही अनेक दुष्कृत्यांची जननी आहे." याचाच प्रत्यय कळंब (ता. इंदापूर, जि. पुणे) येथे बुधवारी (२३ ऑगस्ट) सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे आला. या घटनेत ११ वर्षांपूर्वी पोलीस केस केल्याचा राग मनात धरून एका व्यक्तीने आपल्याच चुलत भावाची धारदार कोयत्याने निर्घृणपणे हत्या केली. या घटनेत हनुमंत सर्जेराव जाधव या ३६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून, त्यांची पत्नी रेश्मा हनुमंत जाधव (रा. जाधववस्ती, कळंब, ता. इंदापूर, जि. पुणे) यांनी वालचंदनगर पोलीस ठाण्यात आपल्या चुलत दीराच्या विरोधात फिर्याद दिली आहे. त्या अनुषंगाने आरोपी दत्तात्रय हरिदास जाधव (रा. जाधववस्ती, कळंब, ता. इंदापूर, जि. पुणे) याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

मृत हनुमंत जाधव बुधवारी (२३ ऑगस्ट) सकाळी आपली पत्नी व मुलगी स्वराली हिच्यासह शेतात गेले होते. यावेळी पाठीमागून येत आरोपीने हनुमंत जाधव यांच्या डोक्यात आणि हातावर धारदार कोयत्याने अनेक वार केले. तदनंतर हनुमंत जाधव यांना रक्तबंबाळ अवस्थेत जवळच असलेल्या कोरड्या विहिरीत ढकलून देत आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. गंभीर जखमी झालेल्या हनुमंत जाधव यांना जेसीबीच्या साहाय्याने विहिरीतून वर काढून कळंब येथील खाजगी रुग्णालयात, तदनंतर बारामती येथील भोईटे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.


आरोपीने २०१२ मध्ये फिर्यादी यांच्या सासू कमल जाधव यांना मारहाण केली होती. त्या अनुषंगाने पती हनुमंत जाधव यांनी केलेल्या केसचा राग मनात धरून आरोपीने तब्बल ११ वर्षानंतर हे घृणास्पद कृत्य केल्याचे फिर्यादी यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे घरातील मोठ्यांच्या समजुतीने न्यायालयात ही केस त्याचवेळी मिटविण्यातही आली होती. मात्र आरोपीच्या मनात धगधगत असलेला राग ११ वर्षानंतर उफाळून आला आणि नको ते घडलं.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट