इंदापूरकरांनो ! हिप्नोटाईज करणाऱ्या त्या महीलेपासून सावधान; जोगवा मागायला आली आणि हिप्नोटाईज करून लुबाडून गेली

मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क

इंदापूर (२७ ऑगस्ट) :- अलीकडच्या काळात लुटारू कोणत्या वेशात येतील हे सांगणं कठीण आहे. पोलीस असल्याची बतावणी करून, हातचलाखीने एटीएम बदलून, लिफ्ट देण्याच्या बहाण्याने नागरिकांना लुबाडल्याच्या अनेक घटना इंदापूर शहरात घडल्या आहेत. मात्र हिप्नोटाईज अर्थात संमोहित करून दिवसाढवळ्या एका मनीषा (खरं नाव आम्ही लपवले आहे) नामी महिलेला चक्क तिच्याच घरात जाऊन लुबाडल्याची धक्कादायक घटना नुकतीच इंदापूर शहरातील राजेवलीनगर (शेंडे मळा) भागातील एका अपार्टमेंटमध्ये घडली.

बुधवारी (२३ ऑगस्ट) सकाळी ११.४५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जोगवा मागण्याच्या बहाण्याने आलेली ही महिला अंदाजे ५०-५५ वयोगटातील असावी. रंग काळा-सावळा असणाऱ्या या महिलेच्या अंगात सोनेरी किनार असलेली हिरवी साडी, खांद्यावर केसरी शाल, कपाळावर भलामोठा गंध, गळ्यात शंखाची माळ, तर हातात पिठाची परडी होती.

हे देखील वाचा - इंदापूर बस स्थानकातील चोऱ्यांचे मास्टर माईंड जेरबंद; आरोपींमध्ये दोन महिलांचा समावेश

या महिलेने मनीषा यांना आधी पिठाचा जोगवा मागितला. तदनंतर घरामध्ये येत चहा बनवून देण्याचा आग्रह केला. दरम्यान, चहा पिताना संसारातील अडी अडचणी आणि संबंधित विषयावर समाधान (solution) सांगत मनीषा यांना हिप्नोटाईज केले. परिणामी, याच भुरळमध्ये मनीषा यांनी स्वतःच हातातील सोन्याची अंगठी काढून देण्यासह एकूण सव्वा तोळे सोने, नवीन साड्या आणि तीन हजारांच्या आसपास रक्कम या महिलेच्या स्वाधीन केली. विशेष म्हणजे हा प्रकार घटनेच्या अनेक तासानंतर मनीषा यांच्या लक्षात आला.


हिप्नोटाईज करणारी ही महिला संबंधित अपार्टमेंटमध्ये जात असतानाचा सीसीटिव्ही फुटेजही सोशल मीडियावर वायरल झाला आहे. या घटनेमुळे शहरात चांगलीच घबराट पसरली आहे. दरम्यान, अनोळखी महिलांना अपार्टमेंट अथवा घरामध्ये येऊ देणं, त्यांच्याशी संभाषण करणं धोकादायक असून, नागरिकांनी, विशेषतः महिलांनी या संदर्भात काळजी घेणं गरजेचं आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट