इंदापूर बस स्थानकातील चोऱ्यांचे मास्टर माईंड अखेर जेरबंद; मुत्सुद्देगिरीचा पाठपुरावा आणि पोलिसांचे प्रयत्न कारणीभूत


इंदापूर पोलिसांचं मोठं यश; तीन आरोपी गजाआड; ७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क

इंदापूर (२६ ऑगस्ट) :- इंदापूर बस स्थानकात निडरपणे चोऱ्या करून अनेक प्रवाशांना लुबाडणाऱ्या, तदनंतरही पोलिसांच्या लांब हातांपासून बराच काळ लांब राहणाऱ्या चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात अखेर इंदापूर पोलिसांना यश आलं आहे. या संदर्भात पोलिसांनी काजल प्रवीण भोसले, अर्पणा  सचिन भोसले आणि सचिन आनंता भोसले (सर्व रा. देऊळगाव राजे, ता. दौंड, जि. पुणे) येथील तिघा आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून ७ लाखांच्या आसपास मुद्देमालही हस्तगत केला आहे. यामध्ये ११ तोळे सोने, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि ८ मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आहेत. सोबतच आरोपींनीकडून बारामती, दौंड, स्वारगेट आणि अहमदनगर परिसरात करण्यात आलेल्या चोरीच्या घटनाही उघडकीस आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. 

१९ ऑगस्ट रोजी बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन अनुजा चिन्मय देशपांडे (रा. मेन रोड, इंदापूर) या महिला प्रवाशाच्या तब्बल ११ तोळे सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्यांनी हात साफ केला होता. या संदर्भात सर्वप्रथम निर्भिड बातम्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या मुत्सुद्देगिरीने "इंदापूर बस स्थानकात चोरट्यांचेच राज्य" या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करताना चोऱ्या रोखण्यात पोलिसांचे अपयश आणि संलग्नित पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. साहजिकच यामागे भूतकाळात बस स्थानकात वारंवार होणाऱ्या चोऱ्यांच्या घटनांची पार्श्वभूमी कारणीभूत होती. बस स्थानकातील चोऱ्यांच्या घटना आणि संबंधित प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजनांच्या दुर्लक्षाकडे मुत्सुद्देगिरी सतत पाठपुरावा आणि दिशानिर्देश करत होते. परिणामी पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

घटनेनंतर प्रसिद्ध केलेले हे वृत्तही वाचा - इंदापूर बस स्थानकात चोरट्यांचेच राज्य; चोऱ्या रोखण्यात पोलीस प्रशासन नेमकं कुठं आणि का कमी पडतंय?

१९ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास घडलेली ही घटना आणि या घटनेनंतर प्रसिद्ध झालेले मुत्सुद्देगिरीचे वृत्त पाहता इंदापूर पोलिसांनी तपासाची चक्रे तात्काळ फिरवत चोरट्यांना बेड्या ठोकल्या. घटनेनंतर सलग ३ दिवस पोलीस वेषांतर करून चोरट्यांच्या मागावर होते. पोनि दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या टीममध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, पोलीस उपनिरीक्षक सुधिर पाडूळे, सफौ. प्रकाश माने, नितीन तांबे, पो. हवालदार ज्ञानेश्वर जाधव, राकेश फाळे, सचिन बोराडे, शुभांगी जाधव, दिलशाद मुजावर, पोलीस नाईक सलमान खान, पोलीस कॉन्टेबल नंदू जाधव, गणेश डेरे, गजानन वानोळे, अकबर शेख, होमगार्ड संग्राम माने, लखन झगडे यांचा समावेश होता.

बसस्थानकातील सीसीटिव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास करत असताना पोलिसांनी बस स्थानकातील या आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांची ही कामगिरी कौतुकास्पद असली तरी बसस्थानकातील चोऱ्या आता पूर्णपणे थांबतील असे गृहीत धरणे चूक ठरेल. त्यामुळे चोऱ्या रोखण्यासाठी बस स्थानकात असलेल्या पोलीस मदत केंद्रात पोलीस कर्मचाऱ्याची उपस्थिती कालही आवश्यक होती आणि भविष्यातही आवश्यक असरणार आहे. याशिवाय एसटी प्रशासनाने देखील प्रवाशांना सुरक्षिततेची हमी देणे, किंबहुना तशी व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट