मध्यरात्री राजेवलीनगर भागात चोरट्यांचा हैदोस; अनेक फ्लॅट, बंद खोल्या फोडल्या; नागरिकांमध्ये दहशत

कायद्याचा धाक राहिला नसल्याचे, उपाययोजनांची तथा पोलिसांची गस्त आवश्यक असल्याचे नागरिकांचे मत

मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क

इंदापूर (३० ऑगस्ट) :- जोगवा मागण्याच्या बहाण्याने घरात घुसून राजेवलीनगर भागातील एका महिलेची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली होती. ही घटना अजून ताजी असतानाच आज (३० ऑगस्ट) मध्यरात्री चार चोरट्यांनी याच भागातील वेगवेगळ्या तीन ते चार अपार्टमेंटमधील बंद असलेले फ्लॅट फोडून हैदोस घालण्याचा प्रयत्न केला. यामध्ये एसटी डेपो समोरील अशोक अपार्टमेंटमधील परदेशी यांचा फ्लॅट, कलीम शेख यांचा बंद हॉल आणि सूरज हाईट्स अपार्टमेंटमधील लॉक असलेल्या स्टोअर रूमचा समावेश आहे. जवळपास सर्वच भागात चोरट्यांची मध्यरात्री बिनधास्त रात्र गस्त चालू होती. मात्र कोणालाही कानोकान खबर लागली नाही. विशेष म्हणजे चोरट्यांनी लॉक तोडण्यासाठी गॅस कटरचा वापर केल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. शहरात वाढत्या चोऱ्या पाहता चोरट्यांवर कायद्याचा वचक राहिला नसल्याची, तथा गावातील सुव्यवस्थेला सुरुंग लागल्याची चर्चा आता होऊ लागली आहे.

सूरज हाईट्स या अपार्टमेंटच्या पार्किंगमधील स्टोअर रूमचे कुलूप तोडून चोरट्यांनी स्टोअर रूमची चाचपणी केली. स्टोअर रूममध्ये काहीच हाती न लागल्याने त्यांनी याच अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये पार्क केलेल्या तीन दुचाकींमधून पेट्रोल काढून घेतले. तर अशोक अपार्टमेंटमधील अक्रम शेख यांचा फ्लॅटही चोरट्यांनी फोडला. विशेष म्हणजे १६ ऑगस्ट रोजी याच अशोक अपार्टमेंटमधील सतिश जगन्नाथ मोरे यांचे फ्लॅट चोरट्यांनी सकाळी ९ ते दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान फोडले होते. दिवसाढवळ्या झालेल्या या प्रकारात सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ७३ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला होता.

हे देखील वाचा - हिप्नोटाईज वैगेरे काही नव्हतं; ही तर देवीच्या नावावर केलेली भोंदूगिरी, हातचलाखी आणि शुद्ध फसवणूक होती


या सर्व घटना 🖕 सीसीटिव्हीमध्ये कैद झाल्या आहेत. अंदाजे २०-३० वर्ष वयोगटातील हे चोरटे संपूर्ण परिसरात मुक्त आणि निर्ढावपणे फिरत असल्याचे सीसीटिव्हीमध्ये स्पष्ट दिसत आहे. गतवर्षीही याच भागातील एका माजी सैनिकाचे फ्लॅट चोरट्यांनी फोडले होते. त्या घटनेचा सीसीटिव्ही फुटेज असूनही चोरट्यांचा अजून थांगपत्ता लागलेला नाही. अशा अनेक घटना या भागात घडल्या आहेत. मात्र मागील काही दिवसांत सतत असे प्रकार होत असल्याने राजेवलीनगर भागातील नागरिकांमध्ये चांगलीच दहशत पसरली आहे. परिणामी चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करण्याची, तसेच राजेवलीनगर भागासह संपूर्ण शहरात पोलिसांकडून पूर्वी सारखी रात्र गस्त सुरू करण्याची मागणी केली जात आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट