टाऊन हॉलचे कंपाऊंड महत्वाचे? का धोकादायक अवस्थेतील भार्गवराम तलावाची पुरातन तटबंदी?
संपादकीय
इंदापूर शहराच्या मध्यवर्ती असलेल्या, तथा इंदापूरच्या वैभवात भर टाकणाऱ्या भार्गवराम तलावाची दगडी तटबंदी सध्या धोकादायक अवस्थेत असून, संबंधित प्रशासनाने वेळीच उपाययोजना न केल्यास या पुरातन तलावाच्या ऐतिहासिक खुणा नामशेष होतील अशी शक्यता निर्माण झाली आहे. सध्या बाग म्हणून वापरात असलेल्या या तलावाची तटबंदी जवळपास ३०० वर्ष पुरातन आहे. तलावाच्या उत्तर बाजूने पूर्व-पश्चिम अशी अंदाजे ३०० ते ३५० मीटर लांब असलेल्या या दगडी तटबंदीची प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दुरावस्था झाली आहे. परिणामी ती ढासळून अपघात होण्याचाही धोका निर्माण झाला आहे. याआधी तलावाची पूर्व बाजूची अंदाजे ३०-४० मीटर तटबंदी ऑक्टोबर २०२० मध्ये झालेल्या अतिृष्टीमध्ये ढासळली होती. तटबंदीचा ढासळलेला तो भाग ३ वर्षानंतर आजही जैसे थे अवस्थेत आहे. परिणामी तटबंदीच्या भराव्यावरून अकलूज लिंक रोडने वाहतूक करणे नागरिकांना त्रासदायक आणि धोकादायक ठरत आहे.
या दगडी तटबंदीवर लिंब आणि वडाची अनेक झाडे नैसर्गिकरीत्या उगवली आहेत. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही झाडे आता सावली देण्याइतपत मोठी झाल्याने साहजिकच या झाडांच्या मुळ्या तटबंदीत खोलवर पसरल्या आहेत. परिणामी तटबंदीची दगडे निखळून तटबंदीला आतील बाजूने डोबळे पडले आहेत. संपूर्ण तटबंदीची कमीजास्त प्रमाणात हीच अवस्था आहे. काही वर्षांपूर्वी तलावाच्या तटबंदीला खेटून वायफाय आणि टेलिफोन केबलसाठी चारी खोदण्यात आली होती. या चारीत पावसाचे पाणी मुरत असल्याने तटबंदी अधिक कमकुवत झाली. परिणामी उरलेली तटबंदी कधीही कोसळेल अशी परिस्थिती आहे. त्यातच बागेत खेळताना लहान मुले अनेकवेळा तटबंदीनजीक जातात. त्यामुळे अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही.



महत्वाचे असलेलेच विषय तुम्ही लावता. हा विषय पण महत्वाचा आहे. तटबंदी कोसळली तर एखाद्याचा जीव जाईल. कोसळलेली तटबंदी 3 वर्षानंतरही तशीच आहे. कोट्यावधी चा निधी नेमकांजातो कुठे?
उत्तर द्याहटवा