सरडेवाडी खून प्रकरणातील चौथ्या आरोपीलाही अटक
आरोपीला इंदापूर बस स्थानकातून अटक; इंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अटक होणारा हा दुसरा आरोपी
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क
इंदापूर (१७ ऑगस्ट) :- १२ जुलै रोजी प्रदिप रघुनाथ पवार (रा. रामतिर्थ तांडा, जळकोट, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) या २६ वर्षीय युवकाचा सरडेवाडी (ता. इंदापूर) हद्दीत निर्घृणपणे खून करण्यात आला होता. केवळ लुबडण्याच्या उद्देशाने चार जणांनी केलेल्या या खून प्रकरणात पुराव्यांचा अभाव असतानाही इंदापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने सर्व आरोपींना मोठ्या शिताफीने बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणातील फरार असलेला चौथा आरोपीही आता इंदापूर पोलिसांच्या कस्टडीत आला आहे. माधव केशव जाधव (रा. तिरुका, जळकोट, जि. लातूर) असे या आरोपीचे नाव असून, पुण्याला निघालेल्या या आरोपीला पोलिसांनी १३ ऑगस्ट रोजी इंदापूर बस स्थानकातून ताब्यात घेतले.
या खून प्रकरणातील आदित्य मोरे (वय २० वर्षे, रा. गुत्ती, जि. लातूर), बालाजी वसंत माने (वय २६ वर्षे, रा. गिताईनगर, ता. उदगिर, जि. लातूर) आणि सागर धनराज जाधव (रा. तिरूका, ता. जळकोट, जि. लातूर) या तिघा आरोपींना पोलिसांनी याआधीच बेड्या ठोकल्या होत्या. पैकी सागर धनराज जाधव या आरोपीला पोलिसांनी इंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतूनच बेड्या ठोकल्या होत्या. ३१ जुलै रोजी पुण्याच्या दिशेने चालला असताना पळसदेव हद्दीत पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या होत्या. हे तिन्ही आरोपी सध्या पुण्यातील येरवडा कारागृहात स्थानबद्ध आहेत.
१३ ऑगस्ट रोजी इंदापूर बस स्थानकातून अटक करण्यात आलेल्या चौथ्या आरोपीला इंदापूर न्यायालयाने १८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या संदर्भात पोलिसांनी न्यायालयाकडे १० दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने ४ दिवसांच्या पोलीस कोठडीची परवानगी पोलिसांना दिली. ॲड. अक्रम शेख यांनी न्यायालयात आरोपीच्या बाजूने युक्तिवाद केला होता.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा