आरोपींनाही अनेक कायदेशीर व मूलभूत अधिकार - ॲड. आशुतोष भोसले

उपस्थितांना कायदेविषयक मार्गदर्शन करताना ॲड. भोसले
इंदापूर (५ सप्टेंबर) :- एखाद्या गुन्ह्यासंदर्भात अटक करण्यात आलेल्या व्यक्तीलाही अनेक हक्क व अधिकार असून, कायद्यांविषयी असलेली अज्ञानता अनेकांच्या कायदेशीर समस्यांचे कारण असल्याचे मत ॲड. आशुतोष भोसले यांनी व्यक्त केले. कायद्याविषयी जनजागृती आणि आरोपींनाही हक्क व अधिकारांची माहिती व्हावी या पार्श्वभूमीवर 'आझादीच्या अमृत महोत्सवाच्या' निमित्ताने राष्‍ट्रीय विधि सेवा प्राधिकरण (National Legal Services Authority (NALSA) यांच्या सूचनेवरून 'इंदापूर तालुका विधी सेवा समिती' आणि 'तालुका वकील संघ' यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (५ ऑक्टोबर) इंदापूर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या 'कायदेविषयक जनजागृती' या कार्यक्रमात ते बोलत होते.

न्यायालयाच्या प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी एस. डी. वडगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला, ॲड. एस. बी. पाटील, ॲड. बी. पी. जगताप, ॲड. आबासाहेब तोरणे, ॲड. अक्रम आसिफ शेख, ॲड. राकेश शुक्ल, ॲड. प्रवीण बारवकर, ॲड. रवी कोकरे, ॲड. माधव शितोळे, ॲड. समीरण पोळ, ॲड. संदीप बांदल, ॲड. संज्योत शिंदे, पक्षकार व अनेक नागरिक उपस्थित होते.

हे देखील वाचा - प्रवाशाचे हॉटेलमध्ये विसरलेले ३० हजार केले परत; घडवले प्रामाणिकपणाचे व माणुसकीचे दर्शन

यावेळी ॲड. आशुतोष भोसले यांनी आरोपींच्या कायदेशीर व मूलभूत अधिकारांबाबत उपस्थितांना विस्तृत मार्गदर्शन करताना, कायदेविषयी अज्ञानता अनेक आरोपींच्या समस्यांचे मूळ कारण बनत असल्याचे म्हटले. आपल्याला कोणत्या कलमांतर्गत अटक करण्यात आली हे जाणण्याचा, त्या कलमांचा अर्थ, घरच्यांना सूचित करण्याचा आणि वकिलांशी संपर्क करण्याचा कायदेशीर अधिकार आरोपींना असून, अटकेत असताना शासकीय खर्चातून आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा व कौटुंबिक आणीबाणी प्रसंगी पॅरोलवर सुट्टी मिळवण्याचा अधिकारही त्यांना असल्याचे भोसले यांनी म्हटले. सोबतच त्यांनी अनेक खटल्यांच्या निकालांचे संदर्भ देत, आरोपी व कैद्यांच्या हक्क व अधिकारासंबंधी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाप्रसंगी, ॲड. अक्रम आसिफ शेख यांनीदेखील मार्गदर्शन करताना, युवा पिढीने भारतीय संविधानाचे वाचन करणे आणि कायद्याविषयी आपल्या मूलभूत हक्कांची व अधिकारांची माहिती आत्मसात करणे आजची गरज असल्याचे म्हटले. हा कार्यक्रम बार असोसिएशनच्या हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. महेश शिंदे यांनी केले.

कोरोना संकटग्रस्तांचे खटले मोफत दाखल केले जातील - एस. डी. वडगावकर, प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी, इंदापूर न्यायालय

कोरोना काळात झालेल्या जिवीतहानीमुळे अनेकजण अनाथ झाले आहेत. ओढवलेले आर्थिक संकट आणि कायदेशीर बाबींच्या अपुऱ्या ज्ञानामुळे अशा लोकांना सध्या अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अशा संकटग्रस्त लोकांकडून परिस्थितीच्या अनुषंगाने दाखल करण्यात येणारे खटले मोफत दाखल करून घेतले जातील. सोबतच राज्यशासन आणि NALSA च्या माध्यमातून त्यांच्यासाठी मोफत कायदेशीर मार्गदर्शन आणि वकिलांची नेमणूक देखील करण्यात येईल.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट