भीषण अपघात - लोणी देवकर नजीक कंटेनरची दुसऱ्या कंटेनरला मागून धडक; चालक जागीच ठार
लोणी देवकर (१४ ऑक्टोबर) :- पुणे सोलापूर हायवेवरील लोणी देवकर (ता. इंदापूर) नजीक पुण्याच्या दिशेने निघालेल्या हैदराबाद (तेलंगणा) येथील कॉस्मो कैरीइंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कंटेनरने (AP-13-X-9135) टाटा मोटर्स कंपनीच्या दुसऱ्या एका कंटेनरला (MH-04-GC-5875) मागून धडक दिल्याने अपघात झाला असून, आज रात्री १ वाजण्याच्या आसपास झालेल्या या अपघातात मागून धडक देणाऱ्या हैद्राबाद येथील कंटेनरचा चालक जागीच ठार झाला असल्याची प्राथमिक माहिती सरडेवाडी टोलनाक्याच्या रुग्णवाहिकेचे चालक पप्पू जगताप यांनी दिली आहे.
हैद्राबाद येथील कंटेनरने मागून धडक देण्याचे नेमके कारण समजले नसून, मृत चालकाची ओळख देखील अद्याप पटू शकलेली नाही. हा अपघात एवढा भीषण होता की, मागून धडक देणाऱ्या कंटेनरचा पुढचा भाग संपूर्ण चक्काचूर झाला असून, क्रेनच्या साहाय्याने ओढून या दोन्ही कंटेनरला वेगळे करण्यात आले, तर मृत चालकाला बाहेर काढण्यासाठी देखील बराच अवधी लागल्याचे पप्पू जगताप यांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आणि सरडेवाडी टोलनाक्याचे रुग्णवाहिका चालक पप्पू जगताप, रुग्णवाहिकेचे डॉक्टर राहुल कदम, प्रदीप काटे, संजय राऊत, सलमान पठाण, योगेश धोत्रे (MSF) घटनास्थळी पोहोचले होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा