मातंग समाजाचे प्रश्न आक्रमकपणे मांडणार- दत्ता भाऊ जगताप

दत्ता भाऊ जगताप यांना निवडीचे पत्र देताना संस्थापक अध्यक्ष विष्णू भाऊ कसबे

इंदापूर (८ ऑक्टोबर) :- भविष्यात आपण मातंग समाजाचे प्रश्न आक्रमकपणे मांडणार असल्याचे मत लहुजी शक्ती सेनेचे नवनियुक्त पुणे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ जगताप यांनी म्हटले आहे. केडगाव चौफुला येथे रविवारी लहुजी शक्ती सेनेच्या झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. मातंग समाजाच्या विविध प्रश्नांसह अनेक सामाजिक मुद्यांवर यशस्वी आंदोलन करणारे कालठण येथील दत्ताभाऊ जगताप यांची नुकतीच लहुजी शक्ती सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. याआधी ते इंदापूर तालुकाध्यक्ष म्हणून काम करत होते. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू भाऊ कसबे यांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. यावेळी संघटनेचे महाराष्ट्राचे कोअर कमिटीचे अध्यक्ष कैलास दादा खंदारे, पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष महादेव दादा भोसले आणि पुणे, सोलापूर, विदर्भ, मराठवाडा अशा अनेक जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

निवडीनंतर दत्ता भाऊ जगताप यांच्याबद्दल गौरवोद्गार काढताना विष्णू भाऊ कसबे यांनी, दत्ता भाऊ जगताप हे मातंग समाजाचे आधुनिक फकीरा असल्याचे म्हटले. त्यांनी तालुकाध्यक्षपदी असताना समाजाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रशासनाच्या तसेच प्रस्थापितांच्या विरोधात वेगवेगळ्या प्रकारची यशस्वी आंदोलने करून पीडीतांना न्याय मिळवून दिला असल्यानेच त्यांची पुणे जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आल्याचे कसबे यांनी म्हटले. संघटनेच्या ध्येयधोरणांना कोणतेही गालबोट न लागता ते निश्चित या पदाला न्याय देतील अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी कैलास दादा खंदारे तसेच उपस्थित सर्व पदाधिकारी यांनी दत्ताभाऊ जगताप यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले.

निवडीनंतर दत्ता भाऊ जगताप यांनी, माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्यांवर विश्वास टाकला यासाठी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू भाऊ कसबे व राज्यातील संघटनेत काम करणाऱ्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. दिलेली जबाबदारी मी  निश्चितपणे संघटनेच्या ध्येय धोरणाच्या अधीन राहून पार पाडण्याचा प्रयत्न करून, संघटनेचे जाळे सबंध जिल्हात वाढवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आणि समाजाच्या अडीअडचणी व न्यायहक्कासंदर्भात आक्रमक पद्धतीने काम करीन अशी ग्वाही दिली. जगताप यांनी रास्ता रोको, धरणे आंदोलन, भीमा नदी पात्रात जल आंदोलन आणि कोरोना काळात ग्रामपंचायत निधीतून गरजवंतांना धान्याची मदत देखील केली आहे.

दत्ता भाऊ जगताप यांनी ज्या प्रमुख विषयांवर आंदोलने केली.

१) मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात स्वतंत्र आरक्षण मिळावे.

२) संसदभवन आणि विधानभवन येथे क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे आणि साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांची पुतळे बसवण्यात यावे.

३) साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्यात यावे.

४) आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे आयोगाच्या शिफारशी तात्काळ लागू करण्यात याव्या.

५) मातंग समाजावर होणारा अन्याय व अत्याचार रोखण्यासाठी स्वतंत्र आयोग नेमण्यात यावा.

६) साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे महामंडळाचे कर्ज माफी करून त्वरित नवे कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे.

७) मुंबई विद्यापीठाला अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे.

८) आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचा पूर्णाकृती पुतळा इंदापूरच्या नवीन प्रशासकीय इमारतीसमोर बसवण्यात यावा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट