त्या त्या वेळी विरोधक हर्षवर्धन पाटील यांच्या त्या विधानाचाही हवाला देतील


संपादकीय

मावळ येथील एका हॉटेलच्या उद्घाटनाप्रसंगी एकाच व्यासपीठावर उपस्थित पक्ष बदललेल्या वेगवेगळ्या नेत्यांशी खाजगीत झालेल्या चर्चेनंतर ओघाओघात त्याच विषयाला पुढे नेत माजी सहकारमंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी 'आम्हाला भाजपमध्ये जावं लागलं, काही नाही सगळं मस्त आहे, कुठली चौकशी नाही, चांगली झोप लागते' असं अनाहूतपणे आणि गंमतीने केलेल्या विधानाची गल्ली ते दिल्लीपर्यंत चांगलीच चर्चा झाली. त्यांच्या या विधानात तथ्य असो वा नसो, कुठल्या अर्थी, कोणाला उद्देशून त्यांनी हे विधान केलं हे त्यांनाच ठाऊक. मात्र त्यांच्या या विधानामुळे ईडी, सीबीआयसारख्या तपास यंत्रणांचा भाजप गैरवापर करत असल्याच्या भाजप विरोधकांच्या आरोपांना काहीशी बळकटी मिळाल्याचे बोलले जात आहे.

हर्षवर्धन पाटील तुमच्यात आले आणि पवित्र झाले? - उद्धव ठाकरे

पाटील यांच्या या विधानानंतर त्यांचे राजकीय विरोधक राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली चाकणकर, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हर्षवर्धन पाटील आणि भाजपवर चांगलाच निशाणा साधला आहे. रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत हर्षवर्धन पाटील यांनी आपण भ्रष्ट असल्याचे स्वतःहून कुबूल केल्याचे म्हटले होते. तर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आपण तालुक्यात केलेल्या विकासकामांमुळे (ती कामे जनतेलाही विकासाची वाटली पाहिजेत) आपल्याला चांगली झोप लागते असा दुअर्थी टोमणा नाव न घेता पाटील यांना इंदापूर येथील एका कॉम्प्लेक्सच्या भूमिपूजन कार्यक्रमात लगावला होता. खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एका पत्रकार परिषदेत, चौकशा सुरू झाल्या की लोकं तिकडं जातात आणि सुखी होतात. हर्षवर्धन पाटील यांनी या विधानाच्या माध्यमातून सत्तेचा कसा गैरवापर केला जातो हे स्वच्छपणे सांगितल्याचे म्हटले. याआधीही शरद पवार यांनी, ईडी, सीबीआय आणि एनसीबीसारख्या तपास यंत्रणा छापे टाकतात आणि खुलासा मात्र भाजप नेते करतात असा आरोप केला होता. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात भाजपवर प्रश्नात्मक टीका करताना, हर्षवर्धन पाटील तुमच्यात आले आणि पवित्र झाले? असा सवाल उपस्थित करत असे नेते भाजपचे राजदूत (Brand Ambassador) झाले पाहिजेत असा मोफतचा सल्लाही भाजपला दिला होता.


भाजपमध्ये गेल्यावर वाल्याचा वाल्मिकी होतो?

नाना पटोले, नवाब मलिक, संजय राऊत, विजय वडट्टीवार, रोहित पवार यांच्यासह महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी ईडी, सीबीआयसारख्या तपास यंत्रणांच्या कामकाजावर भाजपचा कंट्रोल असल्याची टीका केली होती. मुंबईतील ईडीच्या कार्यालयावर लावलेला 'भाजप कार्यालय' हा बॅनरही याच चौकशा आणि विरोधकांच्या आरोपांचा परिणाम होता. महाराष्ट्रातील सरकार पडत नसल्याच्या वैफल्यातून भाजप हे कृत्य करत असल्याचा व देशात विरोधी पक्षांची मुस्कटदाबी केली जात असल्याचा आरोप शिवसेनेचे संजय राऊत यांनी, तर कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी, ईडी हे भाजपचे राजकीय हत्यार असल्याचा आरोप केला होता. इंदापूर येथील पत्रकार परिषदेत कॅबिनेट मंत्री विजय वडट्टीवार यांनी, चौकशी फक्त भाजप विरोधकांचीच का होते हे नमूद करताना, भाजपच्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले असतानाही चौकशी मात्र कोणाचीही झाली नसल्याचे म्हटले होते. एकंदरीतच भाजप नेता कितीही भ्रष्ट असला अथवा भ्रष्ट नेता भाजपवासी झाला तर त्याची कोणतीही चौकशी होत नाही अर्थातच तो मग 'वाल्याचा वाल्मिकी होतो', असे आरोप भाजप विरोधकांनी याआधीही अनेकवेळा केले आहेत.

याचा अर्थ काय समजायचा?

मागील काही वर्षात अनिल परब, प्रताप सरनाईक, अशोक चव्हाण, छगन भुजबळ, आनंदराव अडसूळ, एकनाथ खडसे, खासदार भावना गवळी यांनी ईडीची पीडा अनुभवली आहे. तर अजूनही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महाविकास आघाडीतील अनेक नेते निशाण्यावर असल्याचे किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केले होते. असे असताना एकही भाजप नेता ईडी आणि इतर तपास यंत्रणांच्या निशाण्यावर का नाही? खुद्द भाजप आणि किरीट सोमय्या यांनी आरोप केलेले अनेक विविधपक्षी नेते भाजपवासी झाल्यानंतर त्यांच्याही फाईली भाजपने का उघडल्या नाहीत? किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले कृपाशंकर सिंह, नारायण राणे, विजयकुमार गावित, बबनराव पाचपुते हे भाजपात आहेत, याचा अर्थ काय समजायचा? असे अनेक सवाल सामान्यांनाही पडत आहेत.

परिस्थिती बदलली तर?

एकेकाळी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असणारे हर्षवर्धन पाटील यांना आजही महाराष्ट्रातील राजकारणात मानाचं स्थान आहे. विरोधकांशीही मैत्रीपूर्ण संबंध ठेवणारा सभ्य राजकारणी अशी ओळख असणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीतील निम्म्यापेक्षा जास्त काळ अनेक खात्यांचे मंत्रिपद सांभाळूनही त्यांच्यावर अपवाद वगळता कधीही भ्रष्टाचाराचे आरोप झालेले नाहीत. भाजपमध्ये जाण्याला त्यांनी अनेकदा बारामतीकरांनी वादाखिलाफी केल्याचं म्हटल होतं. २०१९ ला पक्षानं तिकीट नाकारल्याने भाजपमध्ये जावं लागलं, तो आपला राजकीय निर्णय होता असं स्पष्टीकरणही त्यांनी मावळ विधानावर दिलं आहे. मात्र, त्यांच्या मावळ येथील विधानामुळे भाजप विरोधकांच्या आरोपांना बळकटी मिळाली यात दुमत नाही. किंतु परंतु, ज्या ज्या वेळी तपास यंत्रणांच्या माध्यमातून विरोधक भाजपवर निशाणा साधतील त्या त्या वेळी हर्षवर्धन पाटील यांच्या मावळच्या त्या विधानाचा हवालाही विरोधक देतील हे देखील स्पष्ट आहे. सोबतच, 'आम्हालाही भाजपमध्ये जावं लागलं', हे त्यांचं विधान भाजपच्या विचारधारेशी किंवा मोदींच्या व्यक्तिमत्वाशी प्रभावित झाल्याने नव्हे, तर नाईलाजास्तव त्यांनी भाजपला स्वीकारल्याचं सष्ट करत असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे भविष्यात परिस्थिती बदलली तर हर्षवर्धन पाटील काय निर्णय घेतील? असा सवालही इंदापूरकरांना पडत आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट