भाजपमध्ये जावे लागले, कोणतीही चौकशी नाही, आता शांत झोप लागते - या वक्तव्यावर हर्षवर्धन पाटील यांचे स्पष्टीकरण
इंदापूर (१३ ऑक्टोबर) :- मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, अर्थाचा अनर्थ केला गेला. भाजपमध्ये जाण्याचा आणि चौकशीचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी मावळमध्ये केलेल्या वक्तव्याच्या संदर्भात दिले आहे. कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर आज इंदापूर अर्बन बँकेच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मावळ (जि. पुणे) तालुक्यातील एका हॉटेलच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये हर्षवर्धन पाटील यांनी, 'आम्हाला भाजपामध्ये जावे लागले, सर्व काही मस्त आहे, आता शांत झोप लागते, कोणतीही चौकशी नाही, काही नाही, असे वक्तव्य केले होते.
मावळमधील या कार्यक्रमाला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री बाळा भेगडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके असे वेगवेगळ्या पक्षाचे नेते उपस्थित होते. एकाच व्यासपीठावर असलेल्या वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांशी मनमोकळ्या गप्पा झाल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी भाषण करताना त्या गप्पांशी संबंधित गंमतीने केलेल्या या वक्तव्याची मात्र राजकीय वर्तुळात आणि माध्यमांमध्ये भलतीच चर्चा रंगली. 'कोणता असा घोटाळा आहे ज्याच्या चौकशीच्या भीतीने हर्षवर्धन पाटील यांना भाजप प्रवेशापूर्वी झोप लागत नसावी? किंबहुना भविष्यात चौकशी झालीच तर हर्षवर्धन पाटील चौकशीला सामोरे जाणार का? आपण गमतीत बोलला पण खरे बोलला अशा संशयात्मक चर्चा रंगू लागल्या होत्या.
आज इंदापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांनी या विषयाला हात घातल्यानंतर त्यांनी वरील स्पष्टीकरण दिले. आपल्याला २०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट देण्याचा शब्द पक्षाने न पाळल्यानेच आपल्याला भाजपमध्ये जाण्याचा राजकीय निर्णय घ्यावा लागल्याचे सांगताना हर्षवर्धन पाटील यांनी, चौकशीचा आणि भाजपमध्ये जाण्याचा काहीही संबंध नसल्याचेही म्हटले आहे. किंतु परंतु, आपण निष्कलंक आणि आपला कारभार पारदर्शी असल्याने आपण कोणत्याही चौकशीला घाबरत नाही, असे स्पष्टीकरण संबंधित विषयावर हर्षवर्धन पाटील यांनी दिले असते तर कदाचित अधिक उचित आणि मावळ येथील वक्तव्यावरुन सुरू असलेल्या प्रश्नात्मक आणि संशयात्मक चर्चांना फुलस्टॉप लागला असता.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा