अपघात - पुणे सोलापूर महामार्गावर पंक्चर झालेल्या टेम्पोला मागून धडक; एकजण जागीच ठार
| अपघातग्रस्त टेम्पोतून मृत व जखमींना बाहेर काढताना |
(डाळज नंबर - १) :- पुुणे सोलापूर महामार्ग मृत्यूचा सापळा ठरत असून, पुण्याहून सोलापूरच्या दिशेने निघालेल्या मालवाहतूक आयशर टेम्पोने (MH-14-GU-7078) डाळज नंबर १ (ता. इंदापूर) येथे टायर पंक्चर झाल्यामुळे साईड पट्टीच्या बाजूला (डावीकडे) उभ्या असलेल्या दुसऱ्या टेम्पोला (MH-16-T-7824) आज रात्री १ वाजण्याच्या सुमारास मागच्या बाजूने धडक दिल्याने भीषण अपघात झाला असून, बुधवारी झालेल्या मुसळधार पावसात टेम्पो चालकाला समोर उभा असलेला टेम्पो न दिसल्याने हा अपघात झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. तर या अपघातात धडक देणाऱ्या टेम्पोचा चालक जागीच ठार झाला असल्याची माहिती महामार्ग पोलीसांकडून देण्यात आली आहे.
मृत चालकाचे नांव मेहबूब जमादार (रा. रमाई वसाहत, कासारवाडी, पुणे) असल्याची माहिती समोर येत असली तरी, अद्याप पोलीसांकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. तर टेम्पोतील इतर दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की, धडक देणाऱ्या टेम्पोचा पुढचा भाग संपूर्ण चक्काचूर झाला असून, मृत चालकाला आणि जखमींना बाहेर काढण्यासाठी आपल्याला अनेक तासांचा अवधी लागल्याचे सरडेवाडी टोलचे रुग्णवाहिका कर्मचारी पप्पू जगताप यांनी सांगितले.
हे देखील वाचा - अटकेत असलेल्या आरोपींनाही अनेक कायदेशीर अधिकार व मूलभूत हक्क- ॲड. आशुतोष भोसले
महामार्ग पोलीसांना घटनेची माहिती मिळताच इंदापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बी. आर. शिंदे, हेड कॉन्स्टेबल डी. के. मदने, पोलीस नाईक एन. डी. वाघ, भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धडस, हेड कॉन्स्टेबल वाघमारे घटनास्थळी पोहोचले. पोलीसांनी तात्काळ हालचाली करत, सरडेवाडी टोलच्या रुग्णवाहिकेचे चालक पप्पू जगताप, कर्मचारी समीर सय्यद, माऊली सरक आणि प्रवीण खरमाटे, अमोल मजगुडे, भरत ओव्हाळ यांच्या सहकार्याने मृत चालक व जखमींना अपघातग्रस्त टेम्पोतून बाहेर काढले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा