बिग ब्रेकिंग - धन्यकुमार गोडसे यांची बदली; आर्थिक तडजोडीशिवाय यावा नवा अधिकारी
![]() |
| पोलीस निरीक्षक धन्यकुमार चांगदेव गोडसे |
समीर सय्यद (उपसंपादक)
इंदापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक धन्यकुमार चांगदेव गोडसे यांची बदली करण्यात आली असून, त्यांची नियुक्ती आता सोलापूर ग्रामीणला करण्यात आल्याची खात्रीशीर माहिती समोर येत आहे. त्यांनी जानेवारी (२०२१) महिन्यात इंदापूर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला होता. तत्पूर्वी त्यांच्याकडे बारामती विभागाच्या वाहतूक शाखेचा पदभार होता. त्यांनी मागील काही दिवसांत वाळू माफियांवर धडक कारवाई करत उडवलेल्या जवळपास १९ यांत्रिक बोटी तालुक्यात चर्चेचा विषय ठरल्या होत्या. त्यांच्या या धडक आणि धाडसी कारवाया त्यांच्या बदलीचा संकेत असल्याची कुजबुज शहरात काही दिवसांपासून सुरू होती.
इंदापूर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच त्यांनी गणेश पवार टोळीतील पाच जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करत गुन्हेगारांना 'हद मे रहो' असा इशारा दिला होता. विशेष म्हणजे इंदापूर शहराच्या इतिहासात मोक्का कायद्यानंतर्गत कारवाई झाल्याची ही पहिलीच घटना होती. उजनी पाणी प्रश्नावरून विना
परवानगी इंदापूर तहसील कचेरीसमोर जनहित शेतकरी संघटनेचे होणारे आंदोलन गोडसे यांनी हाणून पाडले होते. तर त्यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे फोटो वापरून कोणी अज्ञात त्यांच्या नावाचे फेक फेसबुक अकाऊंट बनवून पैशांची मागणी करत असल्याची बाब त्यांनी स्वतः व्हाट्सएपच्या माध्यमातून दिली होती.
दरम्यान, एक चांगले, प्रामाणिक व धाडसी अधिकारी म्हणून गोडसे यांचे नांव तालुक्यात चर्चिले जात होते. इंदापूर पोलीस ठाण्याच्या ६ महिन्यांच्या त्यांच्या अल्पशा मात्र धडाकेबाज कार्यकाळात त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाहीत. श्रीकांत पाटील यांनी कालच (१५ ऑगस्ट) तहसीलदार पदाचा पदभार स्वीकारला असून, येणारा पोलीस अधिकारीही याच पटीतला असणे महत्वाचे आहे. आता कोणता अधिकारी येणार याबाबत वेगवेगळी नांवे चर्चेत आहेत. किंतु परंतु येणारा पोलीस अधिकारी लक्ष्मी पुरस्कृत नसावा हे महत्वाचे. अर्थातच आर्थिक तडजोडीशिवाय नियुक्ती झालेला असावा अशीच भावना इंदापूरकरांची असेल.


खुप छान बातमी सादरीकरण
उत्तर द्याहटवाधन्यवाद 🙏
हटवा