प्रेयसीला भेटता येत नाही म्हणून गळा चिरला; पण भिगवण पोलीसांनी त्याला २४ तासात पकडला.

गळा चिरून खून करण्यात आलेला युवक महेश चव्हाण 

नुकताच भिगवण पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या नेतृत्वाखाली कोणतेही पुरावे उपलब्ध नसताना, भिगवण पोलीसांनी अवघ्या २४ तासांत, गळा चिरून करण्यात आलेल्या खुनाचा छडा लावत दोघा आरोपींना अटक करण्याची महत्वपूर्ण कामगिरी केली आहे. प्रेमप्रकरणातून झालेल्या खुनाप्रकरणी भिगवण पोलीसांनी अनिकेत उर्फ बबलु विकास शिंदे व गणेश हनुमत शिंदे (दोघेही रा. अकोले, ता. इंदापूर, जि. पुणे) यांना अटक केली आहे. मंगळवारी (२४ ऑगस्ट) सकाळी १० च्या सुमारास भादलवाडी गावाचे हद्दीत निरा-भिमा नदी जोड प्रकल्प येथील डंपिग यार्डमध्ये दगडांच्या ढिगाऱ्यावर एका अनोळखी युवकाचा गळा चिरलेला मृतदेह आढळला होता. चौकशीअंती तो मृतदेह महेश दत्तात्रय चव्हाण (वय ३४, रा. रावणगाव, एरीगेशन कॉलनी, कांबळेवस्ती, ता. दौंड, जि. पुणे) या युवकाचा असल्याचे निष्पन्न झाले होते.

हे देखील वाचा - पोलीसांच्या अंगावर वाळू तस्करांनी ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा केला प्रयत्न

सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी, खुनाचा छडा लावण्यासाठी भिगवण पोलीसांच्या ३ वेगवेगळ्या टीम रवाना केल्या होत्या. गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषणामध्ये मयताच्या पत्नीचे माहेरच्या अनिकेत उर्फ बबलु विकास शिंदे (२१ वर्ष) या युवकाशी प्रेमसंबंध असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने पोलीसांनी अनिकेत व मयत महेश याच्या पत्नीला ताब्यात घेऊन पोलीसी खाक्या दाखवताच अनिकेत शिंदे याने प्रेयसीला भेटता येत नसल्याचे कारण देत महेशचा खून आपला चुलत भाऊ गणेश शिंदे याच्यासह मिळून सोमवारी (२३ ऑगस्ट) रात्री १० च्या सुमारास गप्पा मारण्याच्या बहाण्याने घटनास्थळी नेऊन धारदार कोयत्याने गळा चिरून केल्याचे कबूल केले. इंदापूर न्यायालयाने त्यांना ६ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

सदरच्या कामगिरीमध्ये, भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या नेतृत्वाखाली, पोलीस उपनिरीक्षक सुभाष रूपनवर, पोलीस उपनिरीक्षक विनायक दडस पाटील, पोलीस अंमलदार नाना वीर विठ्ठल वारगड, समीर करे, सचिन पवार, महेश उगले, केशव चौधर, महेश माने, संदीप पवार, विजय लोढी, अंतुल पठाण, पालसांडे, भांडवलकर, अंकुश माने, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अमलदार अभिजीत एकशिंगे, अनिल काळे, रवीराज काकरे यांनी समांतर तपास करून गुन्हा उघडकिस आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

पारदर्शी कारभार व सामान्यांशी घट्ट नाळ असणारा अधिकारी म्हणून ओळख

वालचंदनगर पोलीस ठाण्याचा कारभार पारदर्शी करणारा व सामान्य नागरिकांशी नाळ घट्ट असणारा सिंघम अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी इंदापूर तालुक्यात आपली ओळख निर्माण केली आहे. धडक कारवाया करत वालचंदनगर हद्दीतील अवैध व्यवसायांना बऱ्यापैकी आळा घालणाऱ्या दिलीप पवार यांच्याकडे नुकताच भिगवण पोलीस ठाण्याचा कारभार देण्यात आला आहे. कारभार स्वीकारताच वरील खुनाचा छडा लावत पवार यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवली आहे. त्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्यानंतरही भिगवणला पोलीस ठाण्याला दिलीप पवार यांच्यासारखा चांगला अधिकारी मिळाल्याची भावना नागरिक आणि पोलीसांमध्ये आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट