इंदापूर तालुक्यातील ३ वाळू तस्कर तडीपार; ५०-६० गुन्हेगार पोलीसांच्या हिटलिस्टवर
इंदापूर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारताच पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर ऍक्शन मूडमध्ये आले असून, इंदापूर तालुक्यातील ३ वाळू तस्करांना इंदापूर तालुक्यासह दौंड, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा आणि नगर जिल्ह्यातील कर्जत, जामखेड तालुक्यातून पुढील सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. याशिवाय गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेला बाधक ठरू शकणाऱ्या इंदापूर तालुक्यातील जवळपास ५०-६० गुन्हेगारांची कुंडली इंदापूर पोलीसांनी तयार केली असून, यांच्यावर लवकरच तडीपार अथवा मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली जाणार असल्याचे इंदापूर पोलीसांनी प्रसिद्ध केलेल्या प्रेस नोटमध्ये म्हटले आहे.
इंदापुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उजनी जलाशयातून रात्री अपरात्री बेकायदा वाळू तस्करी तसेच गावातील व तालुक्यातील लोकांना गोळा करून मारमारी करण्यासारख्या व अन्य गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमुळे योगेश नंदु जगताप (वय २८ वर्षे, रा. हिंगणगाव, ता. इंदापुर जि. पुणे, टोळी प्रमुख), सौदागर बाळासाहेब ननवरे (वय २९ वर्षे, रा. कांदलगाव ता. इंदापुर जि.पुणे, टोळी सदस्य), सुरक्षित वंसत रांखुडे (वय ३१ वर्षे रा. कांदलगाव ता. इंदापुर जि. पुणे, टोळी सदस्य) यांना पुढील सहा महिन्यांकरिता वरील ठिकाणांहून हद्दपार करण्याचा आदेश काढण्यात आला आहे. सदरच्या व्यक्ती या ठिकाणांमध्ये आढळून आल्यास इंदापूर पोलीस ठाण्याला ०२१११-२२३३३३ या नंबरवर माहिती देण्याचे आवाहन या भागातील नागरिकांना करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्याचे नांव गुपित ठेवण्यात येणार आहे.
सोबतच येणाऱ्या गणेशोत्सव उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जवळपास ५०-६० गुन्हेगारांची यादी इंदापूर पोलीसांनी तयार केली आहे, ज्यांच्यावर तडीपार अथवा मोक्कानंतर्गत कारवाई होणार असल्याचे संकेत इंदापूर पोलीसांनी दिले आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा