इंदापूरकरांची सवय श्रीकांत पाटील मोडतील?
![]() |
| भारतीय स्वातंत्र्यदिनाचा झेंडा फडकवून आपल्या दुसऱ्या इनिंगची सुरुवात करणारे तहसीलदार श्रीकांत पाटील |
वायरल झालेली ऑडिओ क्लिप, भिगवण येथील कारवाईची आरोपात्मक चर्चा, रस्त्यांच्या वहिवाटीसंदर्भातील प्रकरणांमध्ये दिरंगाई, असे अपवादात्मक आरोप वगळता 'शासकीय काम सहा महिने थांब' या म्हणीला खोटं ठरवून इंदापूर तहसील कार्यालय लोकाभिमुख करणारा, प्रशासनावर वचक ठेवणारा, सामाजिक कामात सहभागी होणारा, 'ऑन द स्पॉट न्याय व चुकीला माफी नाय' अशा नायकी नियमात काम करणारा प्रामाणिक अधिकारी' म्हणून ओळख असलेल्या श्रीकांत पाटील यांचा कार्यकाळ सर्वसामान्यांना न्याय देणारा ठरला होता.
वाळू तस्करी करणाऱ्या बोटी, जेसीबी आणि वाहतूक करणाऱ्या वाहनांवर थेट कारवाई करणाऱ्या या डॅशिंग अधिकाऱ्याने शासनाने दिलेल्या उद्दीष्टापेक्षा जास्त महसूल (१ कोटी ९९ लाख ४८ हजार ५५२) वसूल केल्याची ऐतिहासिक बाब आजही इंदापूर तहसीलच्या इतिहासात नमूद आहे. त्यांची पाण्यात सूर मारत केलेली कारवाई विशेष ठरली होती. मंडल अधिकारी, तलाठी, पोलीस कर्मचारी, पोलीस पाटील आणि वनखात्याच्या कर्मचाऱ्यांची पथके तयार करून अवैध वाळू, माती, मुरूम आणि डबर यांची तब्बल २ कोटी ५० लाख ७ हजार रुपयांची दंड वसूली करण्याची किमया त्यांनी साधली होती. शहरालगत असलेल्या अवैध आणि प्रदूषणास कारणीभूत ठरलेल्या विटभट्ट्यांचा बंदोबस्त पाटील यांनी उत्तम पध्दतीने केला होता. सातबारा संगणकीकरणात देखील इंदापूर तालुक्याला पुणे जिल्ह्यात अग्रगण्य करण्याची किमया पाटील यांनी करून दाखवली होती.
पाटील यांच्या दहशतीखाली वाळू तस्करांनी अक्षरशः देव पाण्यात ठेवले होते, तर दुसऱ्या बाजूने सामान्यांना न्याय सहज शक्य करण्याच्या वृत्तीमुळे 'दुसरा तहसीलदार नको' या मानसिकतेतून पाटील यांची बदली थांबावी यासाठी अनेकांनी प्रयत्न केला होता. ज्यामध्ये इंदापूरचे माजी उपनगराध्यक्ष अरविंद वाघ, खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अशोक चोरमले, नगरसेवक पोपट शिंदे यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते व सामान्य नागरिकांचा समावेश होता.
माजी तसीलदारांची कारकीर्द अनेक कारणांनी विवादात्मक ठरली होती. तर प्रभारी तहसीलदार अनिल ठोंबरे यांचा अल्प मात्र समाधानकारक काळही आता संपला आहे. किंतु परंतु कोरोना काळात व्हेंटिलेटरवर गेलेली प्रशासकीय यंत्रणा बघता श्रीकांत पाटील असते तर...अशा भावना नागरिक व्यक्त करत होते. आता प्रत्यक्षात पाटील यांनी सूत्रे हातात घेतली आहेत. त्यामुळे सामान्यांचे प्रश्न लवकर मार्गी लागतील अशी उमेद नागरिकांमध्ये जागली आहे. मात्र, तहसीलमध्ये लहान मोठ्या कामांसाठी नागरिकांना पैसे मोजावे लागतात ही मोठी समस्या कायम नागरिकांना भेडसावत असते. किंबहुना पैसे सुट्टे करूनच लोकांना तहसीलमध्ये जावे लागते हे वास्तव आहे. कागद पुढे सरकवण्यासाठीचा इलाज म्हणून वा नाईलाजास्तव पैशांचे वजन ठेवण्याची सवय झालेल्या इंदापूरकरांची ही सवय मोडेल अशी व्यवस्था महसूल बुडवणाऱ्या वाळू तस्करांना वठणीवर आणणारे पाटील भविष्यात निर्माण करतील का हे पाहावे लागणार आहे.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा