टेंभुर्णी - बेमाप पैशांनी वाळू तस्करांची वाढली हिम्मत; वाळूने भरलेला ट्रॅक्टर पोलीसांच्याच अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

वाळू तस्कराने पोलीसांच्या अंगावर घातलेला ट्रॅक्टर

एक पोलीस कर्मचारी जखमी, एकाला अटक तर दोघे फरार

भीमा नदीतून अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू तस्करांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना वाळू तस्करांनी ट्रॅक्टर अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार टाकळी टें (ता. माढा, जि. सोलापूर) येथे बुधवारच्या मध्यरात्री घडला. तुकाराम माने-देशमुख असे जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नांव असून, ट्रॅक्टर चालक महादेव लक्ष्मण शेळके, सुधीर सोरटे व ट्रॅक्टर मालक समाधान जरक यांच्याविरोधात ३०७, ३५३, ३७९ अशा विविध कलमान्वये टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुधवारी मध्यरात्री भीमा नदीच्या पात्रातून वाळू तस्करी सुरू असल्याची माहिती टेंभुर्णी पोलीसांना मिळाली होती. या अनुषंगाने कारवाई करण्यासाठी पोलीस शिपाई तुकाराम माने-देशमुख व बाळराजे घाडगे हे टाकळी (टें) येथील महादेव मंदिराच्या नजीक जाऊन थांबले होते. 

अवघ्या २ वर्षांच्या या निरागस मुलीची काय चूक? का आणि कोणी फेकलं असेल तिला बेवारस मरण्यासाठी?

अवैध वाळूने भरलेला ट्रॅक्टर घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी चौकशीअंती ट्रॅक्टर पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यास सांगितले. मग काय ! जाऊद्याना साहेबाचे रूपांतर साहेबांनाच धक्काबुक्की व टॉमीने मारहाण करण्यात व ट्रॅक्टर तुकाराम माने-देशमुख यांच्या अंगावर घालून त्यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नात झाला.  

ट्रॅक्टरच्या धडकेत नुकसान झालेले पोलीसांचे वाहन

यामध्ये माने-देशमुख हे जखमी झाले आहेत. तर ट्रॅक्टरचे चाक त्यांच्या दुचाकीवरून गेल्याने दुचाकीचेही नुकसान झाले आहे. दरम्यान, वाळूने भरलेला ट्रॅक्टर जप्त करण्यात आला असून, सुधीर सोरटे याला पोलीसांनी अटक केली आहे. तर चालक व मालक दोघेही फरार आहेत. वाळू तस्करीच्या माध्यमातून मिळणाऱ्या अमाप पैशांचा चस्का लागलेले वाळू तस्कर आता पोलीसांना न जुमानता पोलीसांच्याच जीवावर उठू लागले आहेत. पोलीसांनी ठरवलं तर अवैध वाळू व्यवसाय चालणं शक्य नाही. त्यामुळे पोलीस या घटनेतून बोध घेतील अशी आशा बाळगायला हरकत नाही.

हे देखील वाचा - तर गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करणार - पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर

टेंभुर्णी पोलीस ठाण्यांतर्गत अवैध व्यवसाय, अवैध वाळू उपसा बंद न केल्यास सदर गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचा व संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचा इशारा टेंभुर्णी पोलीस  ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट