या निरागस मुलीचा मृत्यू कसा झाला असेल? हत्या आहे का अन्य काही? स्थानिकांमध्ये वेगवेगळ्या चर्चा
![]() |
| ओढ्यानजीक मृतावस्थेत आढळलेली २-३ वर्ष वयाची मुलगी |
आज (२५ ऑगस्ट) सरडेवाडी (ता. इंदापूर) गावाच्या हद्दीतील बामणस्थळ ओढ्याच्या कडेला दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास एका २-३ वर्षाच्या अनोळखी मुलीचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मुलीची ओळख पटली नसून, ती स्थानिक परिसरातील नसल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. याबाबत सरडेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच सिताराम किसन जानकर यांनी दिलेल्या माहितीआधारे इंदापूर पोलीस ठाण्यात अज्ञात मयत व अनैसर्गिक मृत्यू म्हणून या घटनेची नोंद करण्यात आली आहे. जनावरे
चरवण्यासाठी ओढ्याच्या कडेला गेलेल्या स्थानिक रहिवाशांना आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही मुलगी ओढ्याकडेला मृतावस्थेत आढळून आली होती. दरम्यान, सोमनाथ कोळेकर यांनी याबाबत फोनवरून सरडेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच सिताराम जानकर यांना माहिती देताच त्यांनी उपसरपंच हनुमंत जमदाडे, ग्रामपंचायत सदस्य सतिश चित्राव, रवींद्र सरडे यांच्यासमवेत घटनास्थळी जाऊन वस्तुस्थितीची पाहणी केली व त्वरित इंदापूर पोलीसांना या घटनेची माहिती दिली. दरम्यान, घटना स्थळी महाराष्ट्र सुरक्षा दलाचे अविनाश बोरसे, विनोद पवार, टोलचे कर्मचारी सलमान पठाण, राहुल कदम, अनिल तरंगे, ऍम्ब्युलन्सचे चालक पप्पू जगताप आणि अनेक स्थानिक रहिवाशी दाखल झाले होते. सरडेवाडी टोलनाक्याच्या रुग्णवाहिकेमध्ये या मुलीला इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी ही मुलगी मृत असल्याचे घोषित केले. या निरागस मुलीचा मृत्यू कसा झाला असेल? ही हत्या का अन्य काही याबाबत सध्या स्थानिक रहिवाशांमध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा