कर्ज वसुली अधिकाऱ्यांनो सावधान ! शेतकरी संघटना तुम्हाला झोडपायच्या तयारीत

विभागीय आयुक्त जयश्री कटारिया यांना निवेदन देताना शेतकरी संघटनेचे पदाधिकारी

वसुली अधिकारी आणि शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्याची शेतकरी संघटनेची मागणी

कोरोनाकाळातील एकंदरीत परिस्थिती आणि वित्तीय संस्थांनी शेतकऱ्यांच्या मागे लावलेल्या कर्ज वसुलीच्या तगाद्यामुळे शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत आहेत. वित्तीय संस्थांनी कर्ज वसुलीचा तगादा थांबवला नाही तर शेतकरी संघटना वसुली अधिकाऱ्यांना झोडपून काढेल असा इशारा शेतकरी संघटनेने दिला असून, या आणीबाणीच्या परिस्थितीला सर्वस्वी शासन आणि प्रशासन जबाबदार राहील असेही शेतकरी संघटनेने विभागीय आयुक्तांना बुधवारी (११ ऑगस्ट) दिलेल्या निवेदनात म्हटले आहे

सद्याची हलाकीची परिस्थिती आणि वित्तीय संस्थांचा कर्जवसुलीचा तगादा अशा दुधारी तलवारीखाली मान असलेल्या शेतकऱ्यांना निवडणुकीवेळी नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासह सर्वच पक्षीय नेत्यांनी कर्जमाफीची दिलेली आश्वासने न पाळून शेतकऱ्यांना कर्जाच्या खाईत ढकलले असून, वित्तीय संस्थांनी जबरदस्तीने चालवलेली कर्ज वसुली अन्यायकारक आहे. मुदतीच्या कायद्याचा विचार केल्यास कालबाह्य झालेले हे कर्ज नियमाप्रमाणे राईट ऑफच व्हायला हवे, मात्र वित्तीय संस्थांनी व्याज वाढवण्याच्या दृष्टीने वसूल न केलेल्या या कर्जासाठी आता १५-१५ वर्षानंतर शेतकऱ्यांना धारेवर धरले जात आहे.

इकडे आड तिकडे विहीर अशा दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना त्यामुळे आत्महत्येचा मार्ग आता सोपा वाटू लागला आहे. वित्तीय संस्थांनी कर्जवसुली तात्काळ थांबवावी अन्यथा शेतकरी संघटना वसुली अधिकाऱ्यांना झोडपून काढेल असा इशारा देतानाच, कर्ज राईट ऑफ होऊन शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळण्याचा मार्ग सोपा व्हावा यासाठी विभागीय आयुक्तांनी वित्तीय संस्था, वसुली अधिकारी आणि शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक घ्यावी अशी मागणीही शेतकरी संघटनेने वरील आशयाच्या निवेदनाच्या माध्यमातून विभागीय आयुक्तांना बुधवारी केली आहे.

समस्त कर्जदार शेतकऱ्यांना आवाहन करतो की कर्जदार शेतकऱ्यांनी कर्ज वसुलीस वित्तीय संस्थांचे वसुली अधिकारी आल्यास मुदत कायद्याच्या अधिकाराचा विचार करता आमच्याशी संपर्क साधावा - पांडुरंग रायते (जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना)


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट