लोणी देवकर पुलावर अपघात; खुळे चौकातील २३ वर्षीय व्यावसायिकासह एकजण ठार तर एक जखमी

अपघातात ठार झालेला २३ वर्षीय युवक विजय शिंदे

उपजिल्हा रुग्णालयाला स्वतःची रुग्णवाहिका नाही? राज्यमंत्र्यांनी ना नफा ना तोटा या तत्वावर दिलेली रुग्णवाहिका गेली कुठे?

समीर सय्यद (उपसंपादक)

लोणी देवकर - पुणे सोलापूर हायवेवरील लोणी देवकर (ता. इंदापूर) येथील पुलावर आज सायंकाळी साडेसात वाजण्याच्या आसपास झालेल्या अपघातामध्ये इंदापूर शहरातील खुळे चौकातील २३ वर्षीय व्यावसायिकासह एकजण ठार तर एकजण जबर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव विजय बबन शिंदे (वय २३, मुळ गाव बेळवंडी, ता. कर्जत, सध्या राहणार चांडगाव, ता. इंदापूर) असून, तो इंदापूर शहरातील खुळे चौकात तिरुपती स्टील आर्ट्सचे दुकान चालवत होता.

या अपघातात दुसऱ्या मयत व्यक्तीचे नाव अद्याप समजू शकले नसून, जखमी झालेला एका व्यक्तीचे नाव किशोर अशोक सपकळ (रा. जोगेश्वरी, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) असे असल्याचे पोलीसांनी सांगितले. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हे तिघेही पुण्याला जाण्यासाठी वाहनाच्या प्रतीक्षेत लोणी देवकरच्या पुलावर थांबले असताना सोलापूरहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या एका ट्रकने (MH 16 CC 9092) या तिघांना चिरडले. तर अन्य एका स्विफ्ट गाडीलाही या ट्रकने धडक दिल्याचे सांगण्यात येत आहे. इंदापूर येथील ग्रामीण रुग्णालयात जखमीवर उपचार सुरू असून, इंदापूर पोलीस ठाण्यात या अपघाताबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाला स्वत:ची रुग्णवाहिका नाही?

रात्री ९ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास (काहींच्या मते ८ वाजण्याच्या सुमारास) रुग्णालयात जखमी अवस्थेत आणलेल्या युवक किशोर सपकळ याला प्राथमिक उपचारानंतर गंभीर जखमी असल्याने डॉक्टरांकडून ससून रुग्णालयाला रेफर करण्यात आले होते. मात्र दुर्दैव की कोट्यावधीच्या इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात स्वतःची रुग्णवाहिका नसल्याने हा रुग्ण बराच वेळ इंदापूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये जखमी अवस्थेत पडून होता. त्याच्या तोंडातून बराच रक्तस्त्राव सुरू असताना  १०८ ही रुग्णवाहिका रात्री ११ वाजून ३० मिनिटांच्या आसपास येणार असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. दरम्यान, इंदापूर पोलीसांनी माणुसकीचे दर्शन घडवत स्वतः खिलारे गुरुजी ही खाजगी रुग्णवाहिका बोलावून या रुग्णाला रात्री १० वा. ४५ मिनिटांच्या सुमारास उपचारासाठी पुण्याला पाठवण्याची व्यवस्था केली. मात्र, प्रत्येक मिनिट महत्वाचा असताना रुग्णवाहिकेविना जवळपास बराच काळ जखमी अवस्थेत रुग्णालयात पडून राहिलेला हा रुग्ण दगावला तर याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट