सोशल मीडियाच्या आभासी जगाचे वास्तव
सोशल मीडियाने संपूर्ण जग आपल्या हातात आणून ठेवले असून, कोणत्याही क्षणी हव्या त्या पद्धतीने व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य, मनातील असंख्य भावना दुसऱ्यापर्यंत पोहचवण्यासाठीचे व्यासपीठ आणि तंत्रज्ञान आपणास सोशल मीडियामुळे मिळाले. पण शेवटी आहे हे तंत्रज्ञानच ना ! तंत्रज्ञानाचा वापर आपण कशा पद्धतीने आणि कोणत्या हेतूसाठी करतो, यावर त्याची उपयोगिता ठरते. केवळ थ्रिल अनुभवायच्या नादात सोशल मीडियाच्या आभासी जगण्यावर भाळल्यास आयुष्याचे प्रचंड नुकसान होते.
आता हेच बघा ना की काही वर्षांपूर्वीपर्यंत निवडणुकांच्या वेळेस राजकीय पक्षांचे कार्यकर्ते घराघरात जाऊन प्रचार करायचे. त्यामुळे प्रत्यक्ष भेटी व्हायच्या; पण २०१४ च्या लोकसभा निवडणुकांपासून पूर्ण चित्रच पालटले. २०१४ मध्ये भारतात जवळपास ८ कोटी जनतेकडे इंटरनेट सुविधा उपलब्ध होती. २०१८ मध्ये ती वाढून जवळपास ६५ कोटीपर्यंत पोहोचली. आज देशातल्या एकूण ९०% लोकांच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअॅप आहे. नेमका हाच मुद्दा लक्षात घेऊन राजकीय लोकांनी याचा फायदा घेतला. आज कोट्यावधी लोकांच्या हातात फेसबुक, ट्रिटर, व्हॉट्सअप इ. सारखे तंत्रज्ञान आले. पण यावर येणारी प्रत्येक गोष्ट ही खरी असतेच असे नाही ना! ती गोष्ट खरी आहे की खोटी हे तपासून घेण्याचं भान अजून आपल्याला आलेलं नाही. हे फक्त आपल्या भारतातच घडतं असं नाही. युरोपमधील काही निवडणुकांच्या प्रचाराचा ऑक्सफर्ड विद्यापीठाने केलेल्या अभ्यासाचा निष्कर्ष पुढे आला की, चुकीची माहिती पसरवण्यात सोशल मीडियाचा हात आहे. अशा बातम्यांचा उल्लेख करताना त्यांनी 'जंकन्यूज' असा शब्द वापरला. अशा बातम्या अधिक वेगाने पसरतातही आणि लोक काही विचार न करता विश्वासही ठेवतात. त्यात भर म्हणजे फोटोशॉपचा हवा तसा वापर करून विधानं टाकून फोटो टाकण्याच्या मुबलक घटना घडल्या. फेसबुक, ट्विटरच्या काही पोस्टमुळे सामाजिक तेढ निर्माण होते. २०१९ ची निवडणूक पूर्णपणे सोशल मीडियावर लढवली गेली. येत्या दशकामध्ये कार्यकर्ता विरहीत निवडणूक ही संकल्पना उदयाला आली तरी ते वावगे वाटायला नको. कारण लोकांना आपल्या मताशी सहमत करण्यासाठी हे साधन राज्यकर्त्यांच्या हाताशी आले आहे, आणि हे साधन मात्र आपल्याला आपल्या व्यक्तिगत आयुष्यातील प्रश्नांपासून दूर नेत आहे. २०१४ च्या आधीच्या निवडणुका अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांच्या भोवती फिरायच्या; पण आजचं चित्र वेगळं आहे.
मॅस्केच्या थिअरीतल्या एका भागाप्रमाणे ज्याला 'एस्टीम नीड्स' असं म्हटलं जातं. काहीतरी करून दाखविण्याची प्रेरणा' ह्या प्रेरणेचे स्वरूप देखील पूर्णपणे बदललेलं आहे. आपल्यासमोर येणाऱ्या व्हॉट्सअॅप मॅसेजेसमध्ये पोस्टवर असं काही येत असेल ज्याने पुन्हा एकदा काहीतरी घडलंय याचा भास जरी निर्माण झाला तरी त्यावर विश्वास ठेवायला लोक तयार असतात. आपल्याला वैयक्तिक आयुष्यात काही 'अचिव्ह' करायची संधी खरंच उपलब्ध होत आहे का हा विचार गौण ठरतो. कुठेतरी, काहीतरी घडतय. वाईट, चुकीचं यातही आपण आनंद मानू लागतो किंवा पेटून उठतो आणि ते लोकांना पुढे पाठवीत राहतो हा देखील प्रेरणेचाच भाग झाला आहे. ही प्रेरणा एवढ्यात बदलण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही. त्यामुळे आभासी माध्यमं, आभासी जग आणि त्यातून निर्माण होणारी आभासी प्रेरणा या भोवतीच जग फिरतंय एवढंच खरं!
(आएशा शेख)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा