महावितरण कार्यालयापुढे शेतकऱ्यांचे हलगीनाद आंदोलन
| महावितरण अधिकारी रघुनाथ गोफणे यांना आंदोलन व मागण्यांचे निवेदन देताना जनहित शेतकरी संघटनेचे पदाधिकारी |
इंदापूर तालुक्यातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत असतानाही महावितरण शेतकऱ्यांना दुय्यम नागरिकाप्रमाणे वागणूक देत बेकायदेशीररित्या डीपी सोडवून शेतीपंपाची वीज खंडित करत शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ करत असून, शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकू येत नसलेल्या महावितरण अधिकाऱ्यांच्या बसलेल्या कानठळ्या उघडण्यासाठी जनहित शेतकरी संघटना येत्या मंगळवारी (२४ ऑगस्ट) इंदापूरच्या महावितरण कार्यालयासमोर हलग्या वाजवत हलगीनाद आंदोलन छेडणार आहे. शुक्रवारी (२० ऑगस्ट) तहसील कार्यालयात तहसीलदार आणि महावितरणाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेली चर्चा फिस्कटल्यानंतर जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकरभैय्या देशमुख यांनी या आंदोलनाची घोषणा केली.
महावितरण डीपी सोडवून वीजबिल वसुलीसाठी तगादा लावत असून, घर आणि घराचे वासेही फिरलेल्या शेतकऱ्यांवरील या कारवाईच्या निषेधार्थ शुक्रवारी (२० ऑगस्ट) जनहित शेतकरी संघटनेने इंदापूर महावितरण कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन छेडले होते. दरम्यान, तहसील कार्यालयात तहसीलदारांच्या उपस्थितीत महावितरणच्या अधिकाऱ्यांशी झालेली चर्चा फिस्कटल्यानंतर आता जनहित शेतकरी संघटना येत्या मंगळवारी (२४ ऑगस्ट) महावितरण कार्यालयासमोर हलगीनाद आंदोलन करणार असल्याचे प्रभाकरभैय्या देशमुख यांनी म्हटले आहे. या बैठकीत अनेक शेतकऱ्यांना दिलेली वीजबिले बोगस असल्याचेही देशमुख यांनी महावितरण अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्याचे व ते मान्यही झाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, ही बैठक दबावसदृश परिस्थितीत झाल्याचे त्यांनी मुत्सुद्देगिरीशी बोलताना सांगितले. परंतु हा दबाव कोणी व कशा पद्धतीने निर्माण केला याचा खुलासा त्यांनी केला नाही. दरम्यान, शुक्रवारी बोंबाबोंब आंदोलनासाठी जमलेल्या शेतकऱ्यांमध्ये कारवाईविरोधात भलताच रोष असल्याचे दिसत होते. अजूनही कारवाई सुरूच राहिली तर हलगीनाद आंदोलनाला शेतकऱ्यांची संख्या आणखी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे महावितरणविरुद्ध शेतकरी असा संघर्ष वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा