इंदापूर पोलीसांनो गोळ्या घाला - आंदोलन दडपल्याने प्रभाकर देशमुखांचा राग अनावर

जनहित शेतकरी संघटनेचे आंदोलन दडपतानाचा इंदापूर पोलीस

इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे डीपी सोडवून वीजपंपाची वीज खंडित करण्याच्या महावितरणच्या कारवाईविरोधात महावितरण कार्यालयासमोर आज हलगीनाद आंदोलनाची भूमिका घेणाऱ्या जनहित शेतकरी संघटनेचे आंदोलन इंदापूर पोलीसांनी अवघ्या १५ मिनिटांत उधळून लावले. यावेळी प्रभाकर देशमुख आणि जनहितचे ओमराजे कदम, रविराज काळे, अजय कदम या कार्यकर्त्यांना पोलीसांकडून जबरदस्तीने आंदोलनाच्या ठिकाणाहून इंदापूर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. महावितरण अधिकाऱ्यांच्या सूचना आणि आश्वासने मान्य न झाल्याने देशमुख यांनी महावितरण कार्यालयाबाहेर आंदोलनाला बसण्याची भूमिका घेतली होती. पोलीस आंदोलकांची धरपकड करत असताना पहिलेच आंदोलन असलेले इंदापूर तालुक्यातील जनहितचे कार्यकर्ते मात्र चांगलेच भांबावलेल्या अवस्थेत दिसले. 

आंदोलनावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीसांचा मोठा फौजफाटा यावेळी उपस्थित होता. दरम्यान, पोलीसांनी आंदोलनकर्त्यांना जबरदस्तीने ओढत पोलीस वाहनात बसवले. यावेळी प्रभाकर देशमुख यांचा राग अनावर झाल्याचे दिसले. यावेळी त्यांनी, आमचे आंदोलन लोकशाही मार्गाने सुरू आहे, लोकशाहीचा गळा आवळू नका, बंदुका काढा, गोळ्या घाला, आम्ही शेतकऱ्यांसाठी गोळ्या खायला तयार आहोत, पोलीसांनो कायदा हातात घेऊ नका, तुम्हाला रीतसर निवेदन दिले आहे, पोलीस अधीक्षकांना फोन लावीन, गैर मार्गाने आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करू नका वगैरे वक्तव्य केले.

दरम्यान, २० ऑगस्ट रोजी तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या उपस्थितीत महावितरण अधिकाऱ्यांशी झालेली चर्चा फिस्कटल्यानंतर देशमुख यांनी हलगीनाद आंदोलनाची भूमिका घेतली होती. आज सकाळी ११ वाजता होणाऱ्या आंदोलनाला प्रभाकर देशमुख उशिरा आल्याने पोलीस यंत्रणा व पत्रकार जवळपास चार तास ताटकळत थांबले होते. त्यामुळे जनहित शेतकरी संघटनेने पोलीस यंत्रणेला आणि पत्रकारांना विनाकारण ताटकळत ठेवणे अयोग्य असल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती. सध्या प्रभाकर देशमुख आणि इंदापूर पोलीसांमध्ये इंदापूर पोलीस ठाण्यात चर्चा सुरू असल्याचे समजते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट