इंदापूर लॉकडाऊन - लोकांना घरात डांबून ठेवण्याव्यतिरिक्त अन्य काहीच नाही


संपादकीय

प्रशासनाच्या देखरेखीखाली झालेल्या इंदापूर शहरातील कालच्या हजारोंच्या अनियंत्रित गर्दीने सात दिवस कडक लॉकडाऊनचे काय होणार याचा अंदाजा बेहत्तर आला आहे. केवळ लॉकडाऊन करणे पर्याप्त नसून, लॉकडाऊन काळात प्रतिबंधात्मक उपाययोजनांची मजबूत मूठ बांधने आवश्यक आहे ही साधी बाब प्रशासनाच्या लक्षात येऊ नये का? सक्षम यंत्रणेचा अभाव, तुटपुंज्या उपाययोजना, ढिसाळ नियोजन व भोंगळ कारभाराच्या जोरावर या लॉकडाऊनमधून लोकांना घरात डांबून ठेवण्याशिवाय प्रशासनाच्या हाती अन्य काहीच लागणार नसताना हा एक्सपेरिमेन्ट कशासाठी? आधीच कामधंद्याचं वाटोळं झालेलं आहे. छोटे व्यापारी मेटाकुटीला आले आहेत. खिसा रिकामा, वरून लाईटबिल बोकांडी. हातावरचं पोट असणाऱ्यांची उपासमार होत आहे. मागील एक वर्ष कसाबसा तग धरलेल्या लोकांचा संयम आता ढळू लागलाय.

लॉकडाऊन कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना मात्र पुचक्याच

लॉकडाऊनमुळे कोरोना नष्ट होत नसून, कोरोनाचा संसर्ग काही काळ थांबवून प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी प्रशासनाला वेळ मिळावा हा लॉकडाऊनमागचा मूळ उद्देश असतो. या काळात दीर्घकालीन उपाययोजना करण्याबरोबरच वैद्यकीय सुविधांची त्रुटी भरून काढणे, रुग्णांचे ट्रेसिंग, टेस्टिंगवर भर देणे, लसीकरण जास्तीत जास्त घडवून आणण्यासारख्या उपाययोजना महत्वाच्या असताना यातील काहीच होताना दिसत नाही. प्रशासनाच्या पुचक्या उपाययोजना पाहता केवळ काही तरी करतोय हा दाखवण्याचाच प्रयत्न या लॉकडाऊनमागे दिसत आहे. बरं केवळ लॉकडाऊनमुळे रुग्णसंख्या कशी आटोक्यात येणार?

अँटिजिन चाचण्यांचे किट व लसींचा तुटवडा; आजही चाचण्या बंदच

लॉकडाऊन काळात जास्तीत जास्त टेस्टिंगच्या माध्यमातून रुग्णांचा शोध घेणे व त्यांचे विलगीकरण करणे आवश्यक असते.  लसीकरण होणेही तेवढेच महत्त्वाचे. मात्र, इंदापूर आणि भिगवण येथील शासकीय रुग्णालयांमध्ये किटच्या तुटवड्यामुळे अँटिजिन चाचण्या जवळपास बंद आहेत. आजही इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात किट उपलब्ध नाहीत. मागील १५ दिवसांत एखादवेळ चाचण्या झाल्या असतील. लसींचाही मोठा तुटवडा आहे. चार दिवसातून एकदा ५० लसी. हा वेग पाहता तालुक्याच्या लसीकरणासाठी अनेक वर्षे जातील. पहिला डोस घेणाऱ्यांचा दुसऱ्या डोसचा कालावधीही संपून गेला. अनेकजण अनेक चकरा नंतरही पहिल्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत.

रुग्णांचे ट्रेसिंग करणाऱ्या सर्वेक्षणाचा निव्वळ बट्याबोल

इंदापूर शहरात रुग्णांचे ट्रेसिंग करण्यासाठी तहसील प्रशासनाकडून शिक्षक व नगरपरिषद कर्मचाऱ्यांकरवी २२ एप्रिलपासून "ब्रेक द चेन" या मोहिमेंतर्गत सर्वेक्षण करण्यात आले होते. ३ सदस्यांच्या ३० टीमही बनवण्यात आल्या होत्या. मात्र, आजही शहरातील अनेक भागात सर्वेक्षण झालेच नाही. आणि ज्या भागात झाले तेथे अनेकांची ऑक्सिजन पातळी व तापमान न तपासता केवळ अंदाजे आकडेवारी टाकून सर्वेक्षण उरकण्याची घाई करण्यात आली. इंदापूर नगरपरिषदेने व्यापाऱ्यांना दिलेले कोरोना चाचणीचे आदेशही हसण्याजोगेच होते.

पॉसिटीव्ह रुग्णांच्या बाबतीत प्रशासनाची बेफिकिरी धोकादायक

पॉसिटीव्ह आढळलेल्या रुग्णांचे विलगीकरण करून आवश्यक रुग्णांना ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड उपलब्ध करून देणे व इतरांची रवानगी कोविड सेंटरमध्ये करणे आवश्यक असते. मात्र या बाबतीत प्रशासन अवखळ व बेफिकीर असल्याचे दिसत आहे. पॉसिटीव्ह आलेल्या रुग्णांना कोणतीही विचारणा केली जात नाही. बहुतेकजण होम आयसोलेट होतात. मात्र ते नावालाच. रुग्णांना विना रोकटोक पूर्ण गांवभर फिरण्याची मुभा आहे. कालच्या हजारोंच्या गर्दीतही होते. भरपूर होते. केवळ गोळ्यांचा डोस मागितल्यास शासकीय रुग्णालयात कोविड सेंटरला ऍडमिट व्हा अन्यथा गोळ्या मिळणार नाहीत एवढाच नकार वजा सल्ला रुग्णांना दिला जातो. गोळ्या तरी दिल्या पाहिजेत नाहीतर होम आयसोलेट करणे तरी बंद केले पाहिजे.

शासकीय रुग्णालयांमध्ये अद्यवत सुविधांची कमतरता

रुग्ण झपाट्याने वाढत असताना शासकीय रुग्णालयांमध्ये असणाऱ्या सुविधा वाढवण्यात असल्या तरी अद्यापही त्या अपुऱ्या पडत आहेत. अनेकांना ऑक्सिजन बेडची आवश्यकता भासत आहे. आणखी व्हेंटिलेटरची गरज आहे. या कारणांनी रुग्णांचा मृत्यू झाल्या डॉक्टर व कर्मचारी रुग्णाच्या नातेवाईकांच्या रोषाला बळी पडत आहेत. परवा डॉक्टरांना मारहाणीची घटना ताजी आहे. डॉक्टर, परिचारिकांवर प्रचंड ताण आहे. आणखी कर्मचाऱ्यांची गरज आहे. रुग्णालयात बऱ्याचदा आवश्यक औषधांचा तुटवडा होत आहे. मंजुरी येऊन वर्ष उलटलेले बेडसह तयार बावडा ग्रामीण रुग्णालय इतर सुविधांच्या व डॉक्टरांच्या प्रतीक्षेत आहे. अनेक कोविड सेंटरही नुसते नावाला आहेत.


प्रतिबंधात्मक उपाययोजना अपुऱ्या असतानाही प्रशासनाकडून नागरिकांना केवळ घरात डांबून ठेवण्याव्यतिरिक्त काहीच साध्य होणार नसताना लॉकडाऊनची घाई का करण्यात आली? अनेक दिवसांपासून टेस्टिंग किट उपलब्ध नसताना रुग्णांची आकडेवारी तिनशेच्या जवळपास जातेच कशी? शहरात काल झालेली अनियंत्रित गर्दी सुनियोजित होती का? यावरही नागरिक आता शंका घेऊ लागले आहेत. मृत होत असलेल्या रुग्णांच्या आकडेवारी बाबतही लोकांमध्ये शंकात्मक चर्चा सुरू आहेत. प्रशासनाचा दबाव कमी पडत असल्याने नागरिकही निष्काळजी वागताना दिसत आहेत. 'अति झाले गावचे आणि पोट फुगले देवाचे'...प्रशासनाच्या या चुकांचा जाब प्रशासन आणि जबाबदार लोकांना द्यावा लागणार आहे.

टिप्पण्या

  1. Not just Indapur's but of whole India's lockdown-practice has failed. No Covid-affected city or village has come forward to say that lockdown has helped them 'save lives'. But there are several localities which claim that lockdown has destroyed livelihood and economic security of thousands, if not millions.

    In short, poor administration, and not just spread of virus, is responsible for the prevalent sorry state of affairs.

    You are voicing our concern. Hats off to you. May the ink of your pen never fade! Ameen...>

    उत्तर द्याहटवा
  2. १०/०५/२०२१ रोजी सोशल डिस्टंन्सिंग चा फज्जा ऊडाल्यामुळे जी चैन एस्टाब्लिश झाली आहे, ती ऩियोजनशून्य ७ दिवसांच्या लॉकडाऊन ने कशी ब्रेक होणार? हे कळत नाही.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट