इंदापूर शहरात लॉकडाऊनच्या आयचा घो; तुडुंब गर्दी जमू देणाऱ्या प्रशासनाचा नक्की हेतू काय?


मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क

इंदापूर (१० मे) : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इंदापूर तालुक्यात आजपासून पुढील सात दिवस कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र इंदापूर शहरात प्रशासनाकडून नागरिकांना आज सकाळी ११ वाजेपर्यंत खरेदीच्या बहाण्याने कोरोना पसरवण्याची खुली छुट देण्यात आली होती की काय अशी शंका व्यक्त केली जात आहे. सकाळी खरेदीसाठी झालेल्या तुडुंब गर्दी पाहता नागरिकांचा निष्काळजीपणा आणि प्रशासनाचा हलगर्जीपणा आधीच एका एका बेडसाठी झगडत असलेल्या इंदापूरकरांना पश्चाताप करायला लावणार असल्याचे दिसत आहे.

इंदापूर तालुक्यात पुढील ७ दिवस कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळी ११ वाजेपर्यंत नागरिकांना खरेदीसाठी बाहेर पडण्याची मुभा देण्यात आली होती. मात्र सकाळी झालेल्या नागरिक आणि वाहनांच्या तुडुंब गर्दीमुळे लॉकडाऊनच्या आयचा घो झाल्याचे इंदापूर शहरात पाहायला मिळाले. लोकांना ही मुभा खरेदीसाठी होती, का कोरोना पसरवण्यासाठी देण्यात आलेली खुली छुट होती अशी शंका व्यक्त केली जात आहे.

मुख्य बाजारपेठेसह संपूर्ण इंदापूर शहरात झालेल्या गर्दीमुळे अक्षरशः या गर्दीमध्ये पोलीसांची वाहनेही अडकली होती. हे सर्व पोलीसांच्या देखत सुरू होते. मात्र यावेळी पोलीस प्रशासन आंधळे आणि बहिरे असल्याचे जाणवले. या नियोजनशून्य लॉकडाऊनचा प्रशासन आणि नागरिकांनी मिळून सुनियोजित खून केला असून, भविष्यात कोरोनाचा विस्फोट झाल्यास याची जबाबदारी कोण घेणार? जाणीवपूर्वक जमू दिलेल्या या गर्दीमागे प्रशासनाचा नक्की हेतू काय होता? याचा जाब प्रशासनासोबतच इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी व सामान्य राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनाही द्यावा लागणार आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट