इंदापूर तालुक्यातील आजी माजी मंत्र्यांनी आमदार निलेश लंके यांचा आदर्श घ्यावा - दीपक काटे
इंदापूर (८ मे) : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशातील परिस्थिती बिकट होत चालली असताना स्वखर्चातून ११०० बेडचे कोविड सेंटर उभारून रुग्णांना मायेचा आधार देत आपल्या कुटुंबाप्रमाणे त्यांची सेवा करणारे पारनेर (जि. अहमदनगर) तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार निलेश लंके यांच्या कामातून बोध घेत इंदापूर तालुक्यातील आजी माजी मंत्र्यांसह देशातील सर्व लोकप्रतिनिधींनी काम केल्यास कोरोनावर मात करणे सहज शक्य होईल असे शिवधर्म फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक काटे यांनी म्हटले आहे. गुरुवारी (६ मे) तेे निलेश लंके यांनी उभारलेल्या कोविड सेंटरला भेट देण्यासाठी पारनेर येथे गेले होते.
निलेश लंके यांच्या स्वखर्चातून ११०० बेडचे अद्यवत कोविड सेंटर
देशात कोरोनाचे तांडव सुरू असून, देशभरातील नेतेमंडळी निवडणूका आणि इतर राजकारणात व्यस्त असताना पारनेर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार निलेश लंके मात्र पारनेर तालुक्यातील हजारो कोरोना रुग्णांना बेड, व्हेंटिलेटर आणि आवश्यक औषधे उपलब्ध करून देण्यासाठी जीवाचं रान करताना दिसत आहेत. नुकतेच त्यांनी जवळपास ११०० बेडचे कोविड सेंटर सुरू केले आहे, ज्यामध्ये १०० ऑक्सिजन बेडचाही समावेश आहे.
कोविड सेंटर हेच सध्या आमदार निवासस्थान
कोरोना रुग्णांशी कुटुंबातील सदस्यही दुजाभाव करत असताना निलेश लंके मात्र दिवसातील जवळपास २० तास कोविड सेंटरमध्येच थांबून स्वतः रूग्णांची विचारपूस, ऑक्सिजन पातळी, तापमान तपासणी, औषधांचे वाटप करत रुग्णांची आस्थेवाईकपणे चौकशी करत आहेत. कोविड सेंटरमध्येच राहायचं, तिथंच झोपायचं, तिथंच जेवायचं हाच त्यांचा सध्याचा नित्यक्रम बनला असून, कोविड सेंटर हेच आमदार यांचे निवासस्थान बनले आहे.
निलेश लंके यांचे काम देशातील लोकप्रतिनिधींसाठी प्रेरणादायी
लोकप्रतिनिधी हा जनतेचा सेवक असतो, त्याचं कामच जनतेची सेवा करणे असल्याने माझं काय व्हायचं ते होऊ द्या. मी घरात बसलो तर लोकांनी कोणाच्या दारात जायचं असं म्हणणाऱ्या आमदार निलेश लंके यांच्याप्रमाणे जर इंदापूर तालुक्यातील आजी माजी मंत्र्यांसह देशातील सर्व लोकप्रतिनिधींनी काम केल्यास आपण एकवेळा नव्हे हजारवेळा कोरोनावर मात करू असे शिवधर्म फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक काटे यांनी म्हटले आहे. गुरुवारी (६ मे) ते निलेश लंके यांनी उभारलेल्या कोविड सेंटरला भेट देण्यासाठी पारनेरला गेले होते.
आजी माजी मंत्र्यांनी आता या समस्येतून बाहेर पडायला हवं
इंदापूर तालुक्यातील परिस्थिती बिकट असून, आजी माजी मंत्र्यांनी राजकारण, उद्घाटन आणि श्रेय वादाच्या समस्येतून आता बाहेर पडायला हवं. सद्यपरिस्थिती पाहता लोकांना बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि इतर वैद्यकीय सोयी सुविधांची गरज असून, त्या कशा पूर्ण करता येतील यासाठी आजी माजी मंत्र्यांनी एकत्र येऊन प्रयत्न करायला हवेत, असे म्हणत दीपक काटे यांनी आजी माजी मंत्र्यांना जबाबदारीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला आहे.
शिवधर्म फाऊंडेशन तालुक्याच्या भल्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल
सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत शिवधर्म फाऊंडेशन तालुक्याच्या भल्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यास तयार असून, इंदापूर तालुक्यातील उद्योगपती, नेते, सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संघटना, अधिकारी, डॉक्टर आणि दानशूर लोकांनी एकत्र येऊन वैद्यकीय सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचेही काटे यांनी म्हटले आहे.



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा