होय ! भारत एवढा असहाय कधीच नव्हता


संपादकीय

कोरोनाच्या त्सुनामीत सर्वकाही संपेल असेच काहीसे भीतीदायक वातावरण सध्या देशात निर्माण झाले आहे. अक्षरशः देशात मृतांचे ढिगारे जमा होत आहेत. रोज रुग्णसंख्या ४ लाखांच्यावर तर मृतांच्या आकड्यांचे (३४९८) उच्चांक होत आहेत. मृतांचा आकडा दोन लाखांच्या पुढे गेला असतानाही नेत्यांना मात्र सत्तेची हाव आणि लोकांना निवडणुकांच्या निकालाची चिंता आहे. बंगालमध्ये काय होणार? ममता हॅट्रिक करणार की मोदींची जादू चालणार? आज सकाळपासूनच टीव्हीसमोर लोकांची गर्दी आहे. थोड्या वेळात निकालही स्पष्ट होईल. मात्र १४० कोटी लोकसंख्येच्या आपल्या देशात अर्धा टक्के कोरोना रुग्णांना साध्या आरोग्यविषयी पायाभूत सुविधा न मिळाल्याने मरावे लागत असल्याचे विहंगम दृश्य मन हेलावून टाकत आहे. दुर्दैव आमचं की देशातील विदारक परिस्थिती पाहून पाकिस्तान आपल्यावर तरस खाऊन मदतीची भीक द्यायची का विचारतोय. भूतानकडून मदत घ्यावी लागतेय.

वैद्यकीय सुविधांअभावी अक्षरशः रुग्ण रस्त्यांवर तडफडत आहेत. रुग्णांच्या नातेवाईकांची तगमग सुरू आहे. रेमडेसिव्हरला सोन्याचा भाव आलाय. ऑक्सिजनला ऑक्सिजनची गरज भासत आहे. रुग्णांना व्हेंटिलेटर मिळणे तर केवळ कल्पनाच वाटू लागल्या आहेत. औषधांचा काळाबाजार शिगेवर आहे. या युद्धजन्य परिस्थितीत खाजगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची लूट केली जात आहे. मृतांना जाळण्यासाठी आणि खांदा देण्यासाठीही पैशांची मागणी माणुसकीला काळिमा फासणारी आहे. स्मशानभूमीतील मढी जाळल्याचा धूर संपता संपेना. निधड्या छातीने सीमेवर लढणाऱ्या जवानांच्या कुटुंबियांचा ऑक्सिनज अभावी जीव जाणे लाजिरवाणे आहे. उत्तरप्रदेशमध्ये तर सुविधा नाहीत म्हटले की संपत्ती जप्त करण्याचे हिटलरी फर्मानच काढण्यात आले आहे. मदत करण्याऐवजी प्रत्येकजण एक दुसऱ्याचे लचके तोडताना दिसत असल्याने एकूणच भारतात अनेक देश निर्माण झाल्याचा भास होत आहे. ही परिस्थिती पाहता CAA कायद्यान्वये पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणी नागरिकांना आपण काय देणार असा सवाल पडत आहे.

मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चरची गरज असताना निवडणुकांवर करोडोंची उधळण व्यवस्थेतील विरोधाभास दर्शवत आहे. हा विरोधाभास देश पाहतोय. बिहारचा निवडणूक खर्च ३५०-४०० कोटी, बंगालचा ४५०-५०० कोटी, आसामचा १५० कोटी, तामिळनाडूचा ३५०-४०० कोटी, केरळचा ११२-१२०, पुद्दुचेरीचा २५ कोटी तर मध्यप्रदेशचा तब्बल ३०० कोटी खर्च. हा अफाट खर्च आणि मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चरची कुचाट अवस्था आम्हाला पडत असलेल्या विश्वगुरुच्या गाढ स्वप्नातून कोणीतरी खाडकन कानाखाली मारून उठवल्याचा अनुभव देत आहे. खोटे स्वप्न मोडल्याने कोरोनाचे आभार मानावे का मृतांचे ढीग पाहून रडावं हेच कळेना. एवढ्या प्रचार खर्चात दिल्लीच्या एम्सला टक्कर देणारे २ एम्स देशात तयार झाले असते. प्रत्येक उमेदवार कमीतकमी १० व्हेंटिलेटर बेड बनवू शकला असता. प्रत्येक चार उमेदवारांच्या खर्चात १ मेडिकल ऑक्सिजन प्लांट उभे राहिले असते. ४० हजार व्हेंटिलेटर, १२ हजारपेक्षा जास्त मेडिकल ऑक्सिजन प्लांट उभे राहिले असते. मात्र ने-त्यांना लोकांच्या गरजा नव्हे भावनिक मुद्यांवर मते मिळवण्याची कला चांगलीच उमजली आहे.

प्रत्येक गोष्टीचं श्रेय लाटणारे मोदी आपल्या चुकांचं श्रेय कधीच घेत नाहीत हे वास्तव आहे. ट्रम्पचा नमस्ते अंगलट आला. याचे खापर आधी तब्लिगी जमातवर फोडण्यात आले. मुस्लिमांना टार्गेट करण्यात आले. धार्मिक तेढ वाढवण्याचा प्रयत्नही भरपूर झाला. यावर न्यायालयाने फटकारलेही. तर आता परिस्थिती हाताबाहेर गेली असताना राज्य सरकारांनी लोकांना आत्मनिर्भर करावे असे सल्ले दिले जात आहेत. परिस्थितीवर नियंत्रणासाठी लष्कराची मदत घ्या असे कोर्टाने केंद्राला ठणकावले आहे. मात्र या परिस्थितीत लष्कर काय करणार? कोणत्या सुविधा देणार? ऑक्सिजन की व्हेंटिलेटर? मोदींनी लाखाचे बारा हजार केल्याचे सांगत विदेशी मीडिया थु थु करत आहे. जागतिक व्यंगचित्रकार डेव्हिड रोवे यांनी मोदींना मेलेल्या अर्थव्यवस्थेचा माहूत संबोधले आहे. कोरोना हाताळणीवर ब्रिटनच्या "द गार्डीयन" वृत्तपत्राने मोदींना आत्मविश्वास भोवल्याचे, तर अमेरिकन वृत्तपत्र "न्यूयॉर्क टाइम्स" ने चुकीच्या निर्णयांनी कोरोनाचा पेच आणखी वाढल्याचे म्हटले आहे. "वॉशिंग्टन पोस्ट" ने ही असेच मत व्यक्त केले आहे. एकूणच आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी नेतृत्वावर सवाल उपस्थित करताना भारतातील परिस्थिती यापेक्षा तीस पटींनी जास्त भयानक असल्याचे म्हटले आहे. कोरोनाचा खरा आकडा दाबला जात असल्याचाही आरोप होत आहे.

देशाने याआधी डॉक्टरांना ढसाढसा रडताना कधीच पाहिले नाही. ऑक्सिजन अभावी रुग्णाचे तडपणे त्यांना पाहवेना. अनेकांचे मृत्यू पाहून भविष्यात डॉक्टरच मानसिक रुग्ण होतील याची भीती निर्माण झाली आहे. स्वतःची प्रतिमा आणि ब्रँड उभारण्याकडे लक्ष देणाऱ्या मोदींनी प्रत्येक गोष्टीचा आभास निर्माण करण्यापेक्षा ठोस काही निर्माण करण्यावर भर दिला असता तर परिस्थिती वेगळी दिसली असती. कोरोनावर निव्वळ पोकळ गप्पा, मन की बात, टाळ्या आणि थाळ्याचा प्रसाद. परिस्थितीकडे दुर्लक्ष करून (बे) जबाबदार प्रधानमंत्रांनी कोरोना काळातील निवडणुकांमध्ये ५० पेक्षा जास्त प्रचार रॅल्या चिढ निर्माण करणारे आहे. यात बिहार निवडणुक प्रचारासाठी १२ रॅल्या, पश्चिम बंगाल प्रचारासाठी १८ रॅल्या, आसाम प्रचारासाठी ७ रॅल्या, तामिळनाडू प्रचारासाठी ७, तर केरळ प्रचारासाठी ७ रॅल्यांचा समावेश आहे. #Modi Resign हा हॅशटॅग कितीही चालवला तरी जबाबदारी स्वीकारण्याचं धाडस मोदी करतील असे वाटत नाही. दोन लाखांपेक्षा जास्त भारतीयांचे बळी गेले असताना सत्तेसाठी अनेक पक्षांची प्रचाराची उधळण सुरू होती. निकालानंतर जल्लोषही केला जाईल, परंतु हा जल्लोष मृतांच्या मढ्यांवर नाचल्याचा, असहाय नातेवाईकांच्या वेदनांवर फुंकर मारल्याचा असेल.

असं म्हटलं जातं की रोम जळत असताना नीरो आपल्या महालातून तमाशा बघत होता. ही आग त्यानेच लावली असल्याचेही मत आहे. ही गोष्ट कितपत खरी आहे माहीत नाही. मात्र भारतात कोरोनामुळे लोकांचे मुडदे पडत असताना (बे) जबाबदार प्रधानमंत्री सत्तेसाठी प्रचार रॅल्या करण्यात मग्न असल्याच्या सत्याचे साक्षीदार आम्ही स्वतः आहोत. एक देश म्हणून, लोकशाही म्हणून आपण एकदम बर्बर, नालायक आणि भ्रष्ट सिद्ध झालोय. या भयानक परिस्थितीत लोकांना आरोग्य सुविधा, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर मिळो न मिळो, परंतु ज्या प्रमुख मुद्यांसाठी पूर्ण बहुमताने लोकांनी मोदी सरकारला निवडून दिले होते ते मुद्दे, त्या घोषणा त्यांनी पूर्ण केल्या आहेत. मात्र त्या मुद्यांचा आणि लोकांच्या गरजांचा संबंध अजिबात नव्हता हे लोकांच्या लक्षात येऊ लागले आहे. या परिस्थितीतून देश निघेलच. परंतु सध्यातरी असं वाटतंय की इथे कोणतेही सरकार नाही, कोणताही प्रधानमंत्री नाही, इथे कोणतीच व्यवस्था नाही, प्रशासन नाही. सर्वांना आपापल्या परिस्थितीवर सोडून देण्यात आले आहे. लोकांची काहीच किंमत नाही. सर्वकाही रामभरोसे चालले आहे. त्यामुळे प्रत्येकजण आता अदृश्य शक्तीच्या मदतीची अपेक्षा करतोय. भारत एवढा असहाय कधीच नव्हता. होय ! भारत एवढा असहाय कधीच नव्हता. 

टिप्पण्या

  1. सध्याची परिस्थिती पाहता या लेखा द्वारे काही आंधळ्या लोकांची दृष्टी परत येऊ शकते.....

    उत्तर द्याहटवा
  2. आपण परिस्थितीचे अचूक आकलन केले आहे।" या" सरकार ला हा आपत्काल हाताळण्याचे कौशल्य यापूर्वीच्या सरकारासारखे खचितच नाही। सामूहीक राजीनामे देऊन सत्ता पूर्वीच्या अनुभवी , धुरंधर राजकारण्यांच्या हाती सोपवा आणी देशाचा प्राण वाचवा।

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट