कर्मभूमीबरोबर जन्मभूमीलाही न्याय मिळवून द्या; आमदार यशवंत मानेंना ढोलेंचा विनंतीवजा टोला
![]() |
| अध्यादेशाच्या प्रति फाडताना इंदापूर तालुका शेतकरी कृती समितीचे कार्यकर्ते |
इंदापूर (२७ मे) - इंदापूर तालुक्याचे सुपुत्र व मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी जन्मभूमीपेक्षा कर्मभूमी महत्वाची असल्याचे सांगत इंदापूरकरांच्या विरोधात कडवी भूमिका घेत उजनी पाणी प्रश्नावर सोलापूरकरांची बाजू घेतली होती. माने यांनी कर्मभूमीबरोबरच जन्मभूमीलाही न्याय मिळवून द्यावा असा विनंतीवजा टोला मारत इंदापूर तालुका शेतकरी कृती संघर्ष समितीचे अध्यक्ष श्रीमंत ढोले यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी अध्यादेशाच्या प्रति फाडत राज्य शासनाच्या निर्णयाचा विरोध केला आहे.
![]() |
| राज्य शासनाचा अध्यादेश |
२२ एप्रिल रोजी राज्य शासनाने उजनीतून ५ टीएमसी पाणी इंदापूर तालुक्याला देण्यास मंजुरी दिली होती. इंदापूर तालुक्यातील २२ गावांतील शेतीला याचा फायदा होणार हे इंदापूरकरांचे दिवास्वप्न सोलापूरकरांच्या विरोधामुळे फार काळ टिकू शकले नाही. मोहोळ तालुक्याचे राष्ट्रवादीचे आमदार यशवंत माने यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील सर्वच पक्षांचे लोकप्रतिनिधीं व विविध संघटनांच्या कडव्या विरोधानंतर राज्य शासनाने आज (२७ मे) नवा अध्यादेश काढत २२ एप्रिलचा आपलाच निर्णय रद्दबातल केला आहे. राष्ट्रवादीचे आमदार यशवंत माने यांनी जन्मभूमी पेक्षा कर्मभूमी महत्वाची असल्याचे सांगत इंदापूरकरांच्या विरोधात भूमिका घेतली होती. सोबतच नकळत त्यांनी इंदापूर तालुका मोहोळच्या हक्काचं पाणी लाटत असल्याचा आरोप इंदापूरकरांवर केला होता.
![]() |
| उजनीच्या पाण्याच्या बाबतीत इंदापूर तालुक्याच्या विरोधात भूमिका घेणारे मोहोळचे राष्ट्रवादीचे आमदार यशवंत माने |
यशवंत माने यांनी जन्मभूमी आणि कर्मभूमीत चाललेल्या वादात मध्यस्थाची व न्यायाची भूमिका घेण्याऐवजी इंदापूर तालुक्याच्या विरोधात एकतर्फी भूमिका घेतल्याने संपूर्ण इंदापूर तालुक्यात त्यांच्याविरोधात असंतोष वाढत आहे. यदाकदाचित इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर आल्यावर अथवा तालुक्यातून जाताना त्यांना इंदापूरकरांच्या विरोधाचाही सामना करावा लागेल. आज (२७ मे) राज्य शासनाने इंदापूर तालुक्याला पाणी न देण्याचा अध्यादेश काढल्यानंतर इंदापूर तालुका शेतकरी कृती संघर्ष समितीकडून अध्यादेशाच्या प्रति फाडत राज्यशासनाच्या निर्णयाचा विरोध केला.
शेतकरी कृती संघर्ष समितीचे अध्यक्ष श्रीमंत ढोले यांनी यशवंत माने यांना, कर्मभूमीबरोबरच जन्मभूमीलाही न्याय मिळवून द्यावा असा विनंतीवजा टोला लगावला आहे. सोबतच त्यांनी हा लढा आता न्यायालयात लढणार असून, शेतकरी हिताचा हा लढा आपण न्यायालयाच्या माध्यमातून नक्की जिंकू असा आत्मविश्वास व्यक्त केला आहे.



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा