इंदापूर उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर व परिचारिकेला मारहाण; कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षणाची गरज
इंदापूर (९ मे) - योग्य पध्दतीने उपचार करत नसल्याचे कारण देत इंदापूर उपजिल्हा रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकाऱ्यासह एका परिचारिकेला मारहाण करण्याचा धक्कादायक प्रकार काल (८ मे) इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात घडला असून, दोघा युवकांविरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम ३४, ३५३, ३२३, ३३२, ४२७, ४५१, ४५२, ५०४, ५०६, १८८, २६९, २७०, साथीचे रोग अधिनियम १८९६ कलम ३, ४, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ कलम ५१ आणि महाराष्ट्र सेवा व्यक्ती व संस्था अधिनियम २०१० कलम ४ अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वारंवार होत असलेल्या अशा घटनांमुळे इंदापूर उपजिल्हा रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात येत असून, कोरोनासारख्या युद्धजन्य परिस्थितीत तरी त्यांना पोलीस संरक्षण मिळणे अत्यावश्यक झाले आहे.
इंदापूर शहरातील ५६ वर्षीय कोरोना बाधित व्यक्ती बुधवार (५ मे) पासून उपचारार्थ इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल होती. मात्र आज दुपारी १२.३० च्या सुमारास रुग्णाची तब्येत खालावल्याने रुग्णावर उपचार करत असताना वैद्यकीय अधिकारी डॉ. श्वेता संभाजी कोडग (वय २३ वर्ष, रा. बिबवेवाडी पुणे, सध्या रा. उपजिल्हा रुग्णालय क्वार्टर्स, इंदापूर) व परिचारिका अंजली पवार (रा. इंदापूर) या दोघींना रुग्णाचे नातेवाईक असलेल्या सुनील चंद्रकांत रणखांबे आणि रवी चंद्रकांत रणखांबे (दोघेही रा. पंचायत समिती कॉलनी, इंदापूर) यांनी, प्रतिबंधित कोविड वॉर्डमध्ये दाखल होऊन तुम्ही रुग्णावर व्यवस्थित उपचार करत नसल्याचे कारण देऊन परीचारिकेने उपचारार्थ आणलेल्या औषधांचा ट्रे फेकून देत त्यांना शिवीगाळ, दमदाटी आणि मारहाण केली. विशेष म्हणजे रुग्णालयातील कोविड वॉर्ड प्रतिबंधित असतानाही रुग्णांशी संबंधित अनेकजण आत विना रोकटोक ये जा करत असतात. रुग्णालय स्टाफकडून याची वेळीच दक्षता घेण्यात आली असती तर कदाचित वरील अनुचित प्रकार टळला असता.
हे देखील वाचा - होय ! भारत एवढा असहाय कधीच नव्हता
दरम्यान, सदरच्या धक्कादायक प्रकारानंतर घाबरलेल्या डॉ. श्वेता कोडग आणि परिचारिका अंजली पवार यांनी वॉर्डातून बाहेर येत हा प्रकार रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे व वैद्यकीय अधिकारी डॉ. शेळके यांना सांगितला. या प्रकारानंतर अवघ्या काही वेळातच सदर रुग्णाचा मृत्यू झाला असून, रुग्णाला भरती करतानाच रुग्णाची ऑक्सिजन पातळी अतिशय कमी असल्याने रुग्णाला व्हेंटिलेटरची गरज असल्याची आणि सध्या रुग्णालयात व्हेंटिलेटर बेड उपलब्ध नसल्याची तसेच रुग्णाची तब्येत खालावत चालल्याची कल्पना रुग्णाच्या नातेवाईकांना वेळोवेळी दिली होती, व रुग्णावर उपचार करत असताना वरील अनुचित प्रकार घडला नसता तर कदाचित रुग्णाचा जीव वाचवता आला असता अशी माहिती डॉ. श्वेता कोडग यांनी फिर्यादीमध्ये दिली आहे.
इंदापूर उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षणाची गरज
याआधीही इंदापूर उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी अनिरुद्ध गार्डे आणि इतर कर्मचाऱ्यांना १६ सप्टेंबर २०२० रोजी शेळगाव (ता. इंदापूर) येथील शंकर सुरेश जाधव नामी इसमाकडून शिवीगाळ व मारहाण करण्यात आली होती. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना इंदापूर उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर न भूतो न भविष्यती असा ताण असून, वारंवार घडत असलेल्या अशा अनुचित प्रकारांमुळे स्वतःच जीव धोक्यात घालून रुग्णांना उपचार देणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांचाच जीव धोक्यात आला आहे. सद्यपरिस्थिती पाहता भविष्यातही असे प्रकार होण्याची शक्यता असून, उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण मिळणे अत्यावश्यक झाले आहे. सोबतच असे अनुचित प्रकार वारंवार का घडतायत याचीही चाचपणी झाली पाहिजे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा