इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीचा स्तुत्य उपक्रम; कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत नाष्ट्याची व्यवस्था
इंदापूर (२० मे) - इंदापूर शहरात उपचार घेणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांच्या नातेवाईकांची उपासमार होऊ नये यासाठी इंदापूर तालुका काँग्रेस कमिटी प्रयत्नशील असून, मागील दहा दिवसांपासून जवळपास दोनशे जणांच्या नाष्ट्याची व्यवस्था काँग्रेस कमिटीकडून केली जात आहे. या कामात काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते निस्वार्थीपणे नागरिकांच्या सेवेत कार्यरत असल्याचे दिसत आहेत. या कार्यक्रमाला हजेरी लावणाऱ्या इंदापूर नगरपरिषदेच्या विद्यमान नगराध्यक्षा अंकिता शहा यांनीदेखील या स्तुत्य कार्यक्रमाचे कौतुक केले आहे.
सध्या इंदापूर शहर हे तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या उपाचाराचे केंद्र बनले असून, इंदापूर शहरातील शासकीय तसेच खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या अधिक आहे. साहजिकच या रुग्णांना लागणारी औषधे आणि इतर गरजांसाठी रुग्णांच्या नातेवाईकांनादेखील शहरात थांबावे लागत आहे. घरून जेवणाचा डबा दररोज येईलच व वेळेवर येईलच याची खात्री नसल्याने अनेकांची उपासमार होत असल्याचे निदर्शनात आल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची उपासमार होऊ नये यासाठी काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि पुणे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांच्या आदेशांन्वये इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी मागील दहा दिवसांपासून जवळपास दोनशे जणांच्या नाष्ट्याची व्यवस्था करीत आहेत.
काल या कार्यक्रमाला इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता शहा यांनीही भेट दिली. यावेळी काँग्रेसचे इंदापूर तालुकाध्यक्ष स्वप्नील सावंत, मुकुंद शहा, दिलीप वाघमारे, राष्ट्रवादीचे नगरसेवक प्रशांत शिताप, काँग्रेसचे पुणे जिल्हा सरचिटणीस जकिर काझी, काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्ष सीमा कल्याणकर, इंदापूर शहराध्यक्ष चमन भाई बागवान, उपाध्यक्ष आबासाहेब निंबाळकर , तालुका सरचिटणीस निवास शेळके, खजिनदार भगवान पासगे, महादेव लोंढे, तालुका युवक काँग्रेस सरचिटणीस मिलिंद साबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा