इंदापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा; पोस्टाच्या ५ रुपयाच्या तिकिटावर आता इंदापूरकराचा फोटो


मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क

इंदापूर (३० मे) :-  उत्तम दर्जाचे लेखक व कवी असलेल्या विठ्ठलवाडी (ता. इंदापूर) येथील बापू सोपान भोंग यांच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्याची दखल घेत भारत सरकारच्या पोस्ट (डाक) खात्याने त्यांचा फोटो असलेल्या ५ रुपयांचे तिकीट MY STAMP योजनेंतर्गत प्रकाशित केल्याने इंदापूर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. बापू भोंग यांनी आपल्या कलागुणांच्या जोरावर अनेक राज्यस्तरीय पुरस्कार पटकावले असून, ग्रामीण साहित्यिक म्हणून साहित्य क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

इंदापूर तालुक्यातील विठ्ठलवाडी या छोट्याशा गावात जन्मलेल्या मात्र ग्रामीण साहित्यिक म्हणून स्वतःला सिद्ध करून प्रसिद्ध झालेल्या बापू भोंग यांनी आपल्या साहित्यिक कलागुणांच्या जोरावर सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात एक वेगळा आदर्श निर्माण केला असून, अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांना गवसणी घातली आहे. अनेक विषयांत त्यांचे लेखन दखलपात्र असून, ते उत्तम लेखक, पत्रकार, संपादक, दिग्दर्शक, कथालेखक, समीक्षक, प्रकाशक आणि कवी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नांवे दोन कथा संग्रह आणि दोन कादंबऱ्या असून, आगामी काळात 'पुस्तकाच्या नजरेतून' हा समीक्षा संग्रह आणि 'वेडी सांज रात' हा कविता संग्रह प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहेत.

सध्या भोंग यांच्याकडे मराठी साहित्य मंडळाचे (मुंबई) पुणे जिल्हा सरचिटणीस पद असून, अनेक काव्य संमेलनात सहभाग, तर अनेक कार्यक्रमात त्यांना अध्यक्ष व परीक्षक म्हणून आमंत्रित केले जाते. भोंग यांच्या एकूणच सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील कार्याची दखल घेत भारत सरकारच्या पोस्ट (डाक) खात्याने त्यांचा फोटो असलेले ५ रुपयांचे तिकीट 'MY STAMP' योजनेंतर्गत प्रकाशित केले आहे. कोरोनाची परिस्थिती निवळल्यानंतर या तिकीटाचा प्रकाशन सोहळा होणार असल्याचे बापू भोंग यांनी सांगितले.

काय आहे 'MY STAMP' योजना?

देशभरातील असामान्य व्यक्तिंच्या कर्तृत्वाचा तसेच खेळाडूंचा, याचबरोबर सैन्यदलातील विविध कार्याचा सन्मान करण्यासाठी टपाल विभागामार्फत विशेष तिकिटे काढली जातात. तसेच प्राणी, पक्षी, सिनेजगतातील कलाकार, साहित्यिक, महापुरूष, विविध प्रकल्प यावरही तिकिटे काढली जातात. अशा तिकिटांबरोबरच सामान्य व्यक्तींनासुद्धा आपल्या छायाचित्राचे अथवा आपल्या आवडत्या गोष्टीचे टपाल काढता यावे म्हणून टपाल विभागाने ‘MY STAMP’ ही विशेष योजना सुरू केली. यासाठी ३०० रुपये मुल्य आकारण्यात येते. याबदल्यात आपला आवडता फोटो असलेली ५ रुपयांची बारा तिकिटे संबंधितांना मिळतात. तीनशे रुपयांमध्ये १२ फोटो असलेले एक शीट संबंधिताला मिळते.


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट