इंदापूर नगरपरिषद निवडणुकीत राजकीय समिकरणांच्या उलथापालथीचे संकेत


संपादकीय

२०१९ पासून काँग्रेसकडे पाठ फिरवलेल्या इंदापूरच्या नगराध्यक्षांनी अखेर काँग्रेसच्या कार्यक्रमाला बुधवारी (१९ मे) हजेरी लावली. या कार्यक्रमाला कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना नाष्टा वाटप हा सामाजिक टच असला तरी भूतकाळातील घडामोडी पाहता नगराध्यक्षांनी लावलेल्या या हजेरीचा राजकीय अर्थ लावला जाणे साहजिक असून, आगामी नगरपरिषद निवडणुकीमध्ये राजकीय समिकरणांची उलथापालथ पहायला मिळेल अशी चर्चा सुरू आहे. सध्या इंदापूर नगरपरिषदेवर काँग्रेस पक्षाची सत्ता आहे. इंदापूरचे नगराध्यक्ष आणि सत्ता काँग्रेसचीच असल्याचे काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी अनेकवेळा म्हटले असले तरी, सप्टेंबर २०१९ पासून नगरपरिषदेवर हर्षवर्धन पाटील समर्थक गटाची सत्ता असल्याची बाब त्यांना माहीत नसावी हे शक्य नाही.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसशी फारकत घेऊन भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सोयीनुसार भूमिका घेत नगराध्यक्षांसह इंदापूर नगरपरिषदेचा सत्ताधारी गट काँग्रेसमध्येच राहिला. असे असले तरी विधानसभा निवडणुकीनंतर हा गट काँग्रेसच्या झेंड्याखाली कधीही दिसला नाही. विशेष म्हणजे नगराध्यक्षांसह काँग्रेसच्या संपूर्ण सत्ताधारी गटाने विधानसभा निवडणुकीत उघडपणे हर्षवर्धन पाटील यांचा अर्थातच भाजपचा प्रचार केला होता. पक्षाशी उघडउघड बंडखोरीनंतरही नगराध्यक्ष आणि सत्ता दोन्ही आमचीच या समाधानापायी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी या गटावर कारवाई करण्याचे धाडस आजतागायत दाखवलेले नाही. तर पाटील यांच्या पराभवानंतर या सत्ताधारी गटातही दोन गट पडल्याचे सर्वांना ठाऊक असून, मागील काही घडामोडी पाहता शहा कुटुंबासह एक गट येत्या नगरपरिषद निवडणुकीत वेगळी भूमिका घेईल अशी शक्यता नाकारता येत नाही.


विधानसभेनंतरच पाटील आणि शहा कुटुंबातील जिव्हाळ्याच्या संबंधात दुरावा निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली होती. आता या चर्चांना कारणांचे पाठबळही मिळाले आहे. २९ एप्रिल रोजी काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक व माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या नियंत्रणात असलेल्या इंदापूर अर्बन बँकेच्या चेअरमन पदाचा आणि कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला होता. या घटनेच्या काही दिवसांपूर्वीच हर्षवर्धन पाटील अध्यक्ष असलेल्या व संस्था उभारणीत शहा कुटुंबाचे महत्वाचे योगदान असलेल्या इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव पदाचे अधिकार मुकुंद शहा यांच्याकडून कमी करण्यात आल्याचे बोलले जात आहे. एका पाठोपाठ घडलेल्या या दोन्ही घटनांना केवळ योगायोग म्हणता येणार नाही.


घरगुती अडचणी आणि नव्या लोकांना संधी हे कारण देत भरत शहा यांनी प्रसारमाध्यमांना, 'मी पक्ष कधीच सोडणार नाही, मी पक्षापासून दूर गेलो नाही, मी आजही माझ्या नेत्यासोबत आहे.' अशी प्रतिक्रिया दिली असली तरी 'नेता' आणि 'पक्ष' म्हणून त्यांचा इशारा हर्षवर्धन पाटील आणि भाजपाकडे होता, की दिवंगत खासदार शंकरराव पाटील आणि त्यांच्या मेहनतीने तालुक्यात वाढलेल्या काँग्रेस पक्षाकडे? याचा खुलासा भरत शहा यांनी केला नाही. अजूनही ते काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक आहेत.

वरील घडामोडी पाहता नगराध्यक्षा अंकिता शहा यांची काँग्रेसच्या कार्यक्रमाला हजेरी निश्चितच आगामी निवडणुकीत वेगळ्या राजकीय समिकरणांचे संकेत देणारी आहे. या सर्व घडामोडीनंतर मुळ काँग्रेसी स्वभावाचे शहा कुटुंब आगामी नगरपरिषद निवडणुक कमळावर लढतील याबाबत शंका आहे. उशिरा का होईना मात्र काँग्रेसची वाट धरतात, काही अटींसह राष्ट्रवादीच्या गोठात जातात, का सत्ताधारीतील काही व विरोधकांतील काही अशी स्वतंत्र तिसरी आघाडी स्थापन करतात हे पाहावे लागणार आहे. एकंदरीत नगराध्यक्षांसाठी सर्व पर्याय खुले आहेत. परंतु वरील घडामोडी म्हणजे, इंदापूरची जनता भाजपला कितपत स्वीकारेल याबाबत साशंकता असल्याने नगरपरिषद निवडणुकीआधी पाटील-शहा यांच्या रणनीतीचाच हा एक भाग आहे असाही एक मतप्रवाह इंदापूरकरांमध्ये आहे. असो नसो मात्र यंदाच्या नगरपरिषद निवडणुकीत राजकीय समिकरणांमध्ये बरीच उलथापालथ दिसेल हे नक्की. 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट