राज्य लोकसेवा आयोगाचा निर्णय शेतकऱ्यांच्या मुलांवर अन्यायकारक - तानाजी भोंग


मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क

इंदापूर (२७ मे) : स्पर्धा परीक्षेतील पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी निवड प्रक्रियेत शारीरिक चाचणी संदर्भातील नियमांमध्ये बदल करण्याचा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेला निर्णय म्हणजे शारीरिकदृष्ट्या दिवाळखोरी असलेल्या उमेदवारांना संधी आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांवर अन्यायकारक असल्याचे कारण देत महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे सरचिटणीस तानाजी भोंग यांनी हा निर्णय मागे घ्यावा अशी विनंती निवेदनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. नियमांच्या बदलासंदर्भातील सूचना राज्य लोकसेवा आयोगाने मंगळवारी (२५ मे) आपल्या संकेतस्थळावर जारी केल्या होत्या.


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (Maharashtra Service Public Commission) पोलीस उपनिरिक्षक (PSI) पदाच्या भरतीसंदर्भातील शारीरिक चाचणीच्या नियमांमध्ये बदलाचा निर्णय घेत, पोलीस उपनिरीक्षक पदाची मुलाखत देण्यासाठी शारीरिक चाचणीत ६० गुण मिळवणे आवश्यक असल्याची माहिती मंगळवारी (२५ मे) परिपत्रक काढत दिली होती. या निर्णयानुसार शारीरिक चाचणीत ६० गुण असतील तरच उमेदवाराला मुलाखत देता येणार आहे. उमेदवाराच्या पात्रतेसाठी फक्त मैदानी गुण गृहीत धरले जाणार आहेत. मात्र अंतिम गुणवत्ता यादीतून शारीरिक चाचणीचे गुण वगळण्यात आले आहेत. हे सुधारित निकष २०२० च्या होणाऱ्या स्पर्धा परीक्षेपासून लागू होणार आहेत.


लोकसेवा आयोगाच्या या निर्णयाविरोधात महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे सरचिटणीस तानाजी भोंग यांनी हरकत घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनाच्या माध्यमातून जाचक सुधारणा रद्द करून पूर्वीचे नियम पुनर्स्थापित करण्याची विनंती केली आहे. सदरील नियमामुळे परीक्षेतील शारीरिक गुणाचे महत्व कमी होणार असून शारीरिकदृष्ट्या दिवाळखोर उमेदवारांना संधी, तर बौद्धिकदृष्ट्याच नव्हे तर शारीरिक गुणवत्ता, कष्ट व चिकाटीच्या जोरावर गुन्हेगारी क्षेत्राशी निगडित या पदाला गवसणी घालून गुन्हेगारांवर दबदबा निर्माण करणाऱ्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांवर अन्याय होणार असल्याची भीती व्यक्त करून, भोंग यांनी लोकसेवा आयोग सदरील नियमांच्या फेरबदलांमध्ये पुनर्विचार करेल अशी आशा व्यक्त केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट