पळसदेव - जेवताना ३० हजार हॉटेलमध्येच विसरले, लतीफ होता म्हणून ते परत घावले. आपुलिया हिता जो असे जागता । धन्य माता-पिता तयाचिया।।
| पैशाची बॅग महिलेला परत करताना लतीफ मुलाणी आणि इतर |
समीर सय्यद (मुत्सुद्देगिरी)
जेवताना ३० हजार हॉटेलमध्येच विसरले, लतीफ होता म्हणूनच ते परत घावले. होय बरोबर वाचलं. लतीफ होता म्हणूनच ते घावले. घटना आहे पुणे सोलापूर हायवेवरील पळसदेव (ता. इंदापूर) नजीक असलेल्या हॉटेल उदय येथील. एसटी महामंडळाच्या एसटी बसेसचा थांबा असलेल्या हॉटेल उदयवर शुक्रवारी (१ ऑक्टोबर) थांबलेल्या बार्शी पुणे बसमधील प्रवाशी नौशाद मेहबूब शेख (वय ५०) आपल्या नातेवाईक वसीम सय्यद याच्यासोबत जेवणासाठी थांबल्या होत्या. जेवताना जवळ असलेली ३० हजारांची रोकड व महत्वाच्या कागदपत्रांची बॅग नौशाद शेख हॉटेलच्या टेबलावरच विसरल्या.
बस पुण्याच्या दिशेने भिगवणपर्यंत पोहोचल्यावर पैशांची बॅग आपण हॉटेलमध्येच विसरल्याचे नौशाद शेख यांच्या लक्षात आल्याने प्रचंड घाबरलेल्या नौशाद शेख वसीम याच्याबरोबर तुरंत दुसऱ्या बसने हॉटेल उदयवर आल्या. दरम्यान, प्रसंग ओळखून लतीफ शेख यांनी ही बॅग आपल्या कस्टडीत घेतली होती. ओळख पटल्यावर बॅग नौशाद शेख यांच्या ताब्यात दिली. लतीफ यांच्या प्रामाणिकपणाची किंमत आपल्याला माणुसकीची पोलखोल करणाऱ्या कोरोना काळात झालेली पैशांची लूटमार आणि औषधांचा झालेला काळाबाजार पाहिल्यास सहज लक्षात येईल.
हा निव्वळ योगायोगही नव्हता बरं का ! कारण या आधीही २२ जुलै रोजी घडलेल्या अशाच एका प्रसंगात लतीफ मुलाणी यांनी सोलापूर पुणे बसमधील आर. एस. जाधव नामी प्रवाशाची तब्बल १ लाख ६० हजार रुपये रोख व मौल्यवान दागिन्यांची बॅग परत केली होती. या भौतिक जगात प्रामाणिकपणा आणि नैतिक मूल्येच माणसाची खरी संपत्ती व यातच आपले हित दडलेले आहे या मुहम्मद पैगंबरांच्या ऐन शिकवणींना आचरणात आणणाऱ्या लतीफ मुलाणी यांच्यासारख्या व्यक्तींबद्दल व त्यांना नैतिक मूल्यांचे धडे देणाऱ्या त्यांच्या माता पित्यांबद्दलच कदाचित तुकाराम महाराज म्हणाले असावेत, आपुलिया हिता जो असे जागता । धन्य माता-पिता तयाचिया।।
खरोखरच असे आर्थिक संकट ओढावलेल्या संबंधित प्रवाशांची दुआ घेणारे लतिफ भाई यांना धन्यवाद।खरेच धन्य होत त्यांचे मातापिता ज्यांनी असे नेक संस्कार आपल्या मुलांवर केले।
उत्तर द्याहटवाखुदा आपको ताउम्र बरकत अदा करे
उत्तर द्याहटवा