वनराज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या तालुक्यात वनविभागाच्या अधिकाऱ्यांची दादागिरी - हर्षवर्धन पाटील


समीर सय्यद (उपसंपादक, मुत्सुद्देगिरी)

इंदापूर (१० एप्रिल) : कोरोनासारख्या आपत्तीमध्येही शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांवर वनविभागाने केलेल्या कार्यवाह्यांमुळे इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना जगावे का मरावे हा प्रश्न पडू लागला आहे. गुुरुवारी (८ एप्रिल) अजोती येथील ज्ञानदेव गुटाळ या शेतकऱ्याच्या उसाच्या उभ्या पिकावर वनविभागाने बुलडोझर फिरवल्याने सुमन ज्ञानदेव गुटाळ या महिलेने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यामुळे वनविभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह आणि सद्यस्थितीचे भान नसल्याचा आरोप होत आहे. या घटनेनंतर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर दादागिरीचा आणि राज्य सरकारवर गोरगरिबांच्या विरोधात काम करत असल्याचा आरोप केला आहे.

वनराज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या तालुक्यात काल वनविभागाने केलेल्या कार्यवाहीला अधिकाऱ्यांची दादागिरी आणि कोरोनासारख्या आपत्तीमध्ये आधीच खचलेल्या गोरगरिबांचे आर्थिक कंबरडे मोडण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप होत आहे. गुरुवारी (८ एप्रिल) अजोती (ता. इंदापूर) येथील ज्ञानदेव गुटाळ यांच्या उसाच्या उभ्या पिकावर वनविभागाने बुलडोझर फिरवल्याने त्यांची पत्नी सुमन ज्ञानदेव गुटाळ यांनी विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. सध्या त्यांच्यावर इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, प्रकरण न्यायप्रविष्ट असताना बेकायदेशीर पध्दतीने पूर्वसूचनेविना ही कार्यवाही केल्याचा आरोप गुटाळ कुटुंबीयांनी केला आहे. या आरोपांमध्ये तथ्य असेल तर वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल का होऊ नये?

वनविभागाने जून २०१७ ते ऑक्टोबर २०१९ पर्यंत इंदापूर तालुक्यातील २३ गावांतील तब्बल ७९० एकर शेतजमीनींवर अतिक्रमण असल्याचे सांगत तेथील डाळिंब, ऊस, कडवळ आणि इतर उभ्या पिकांसह पोल्ट्री व इतर जोडधंद्यांवर आणि घरांवर कार्यवाही केली होती. गतवर्षी जूनमध्येही वनविभागाकडून पिंपळे, राजवडी, लासुर्णे, गोखळी, वरकुटे खुर्द येथेही अशीच कार्यवाही करण्यात आली होती. तीन पिढ्या शेतकरी राहत असलेली घरे आणि कर्ज काढून उभारलेले शेतीशी निगडित जोडधंदे व उभ्या पिकांवर वेळ व सद्यपरिस्थितीचे भान हरपलेले वनविभागाचे अधिकारी बुलडोझर फिरवत असल्याने जगावे का मरावे अशा संभ्रमात इंदापूर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक असल्याचे दिसत आहे.

गतवर्षीच्या कार्यवाहीदरम्यान पुण्याचे सहाय्यक वनसंरक्षक संजय मारणे यांनी, वनसंवर्धन कायदा लागू झाल्यानंतर महसूल विभागाने या जमीनींचे वाटप केले होते, त्यामुळे १९८० च्या वनसंवर्धन कायद्याचा भंग झाला असल्याने महसूल विभागाने वाटप केलेली क्षेत्रे ही अतिक्रमण असल्याचे गृहीत धरून वनविभागाने ही कारवाई केली असल्याचे म्हटले होते. कोरोनाच्या संकटकाळात मदतीऐवजी या शेतकऱ्यांवर वनविभागाने विदेशी घुसखोर असल्याप्रमाणे केलेल्या कार्यवाहीबाबत योग्य की अयोग्य असा वादविवाद होऊ शकतो परंतु कार्यवाहीची पद्धत आणि वेळ चुकीची होती यात दुमत असण्याचे कारण नाही.

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी, वनविभागाचे राज्यमंत्री हे इंदापूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असतानाही तालुक्यात वनविभागाच्या अधिकाऱ्यांची दादागिरी सुरू असून, न्यायप्रविष्ट प्रकरणात कोणतीही पूर्वसूचना न देता वनविभाग शेतकऱ्यांवर कार्यवाही करते ही बाब निषेधार्ह असल्याचे म्हटले आहे. सोबतच त्यांनी राज्यसरकारवर गोरगरिबांच्या विरोधात काम करत असल्याचा आरोप करताना गुटाळ कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करू असे आश्वासन दिले आहे. चुकल्यास माझ्या भावावरही कार्यवाही करा असे प्रशासनाला ठोक आदेश देणारे दत्तात्रय भरणे बघुयात वनविभागाचे राज्यमंत्री म्हणून या प्रकरणात कोणती भूमिका घेतात?





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट