नियोजनाअभावी केदारवस्तीवरील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती; गांवकऱ्यांमध्ये नाराजी
पाथरी (८ एप्रिल) : पाण्याचा मुबलक साठा असूनही पाथरी (जि. परभणी) तालुक्यातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. वरखेड केदारवस्ती किन्होळा या ग्रुप ग्रामपंचायत असलेल्या गांवामध्ये पाण्याचा मुबलक साठा आणि सुविधा असूनही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे ऐन उन्हाळ्यात केदारवस्तीवरील रहिवाश्यांना पाण्यासाठी विहिरींवर भटकंती करावी लागत असल्याने गांवकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. पर्यायी ढिसाळ कामकाज करत असलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना निलंबित करून त्यांच्याजागी इतरांची नियुक्ती करण्याची मागणी गांवकऱ्यांकडून होऊ लागली आहे.
पाथरी (जि. परभणी) तालुक्यातील वरखेड हे गांव नावारूपाला मोठे असले तरी विकास कामांसाठी मात्र शुन्य असल्याचे दिसत आहे. पाणी ही माणसाची सर्वात मोठी गरज असूनही वरखेड केदारवस्ती किन्होळा या ग्रुप ग्रामपंचायतमधील केदारवस्तीमध्ये मात्र पिण्याच्या पाण्यासाठी गांवकऱ्यांची ऐन उन्हाळ्यात परवड होताना दिसत आहे. पाण्याची टाकी आणि मुबलक प्रमाणात पाणीसाठा असून देखील गांवकऱ्यांना पिण्याचे पाणी सोडले जात नसल्याने एकूणच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या ढिसाळ कामकाजाचा फटका गांवकऱ्यांना बसत आहे.
नागरिकांना आपला जीव धोक्यात घालून विहिरींवरून पाणी आणावे लागत आहे. मागील एक ते दोन महिन्यांपासून हीच परिस्थिती असून, पाण्यासाठी आता नागरिकांमध्ये वादावादी होऊ लागल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढू लागली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना निलंबित करून त्यांच्याजागी नव्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी केदारवस्तीवरील नागरिकांमध्ये जोर धरू लागली आहे.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा