बिग ब्रेकिंग - लोणी देवकर एमआयडीसीत मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन सिलेंडरचा साठा जप्त; इंदापूर पोलीसांची कामगिरी
लोणी देवकर (२६ एप्रिल) : लोणी देवकर (ता. इंदापूर) येथे असणाऱ्या एमआयडीसीतील Y-Axis Structural Steel Pvt. Ltd या कंपनीत आज (२६ एप्रिल) इंदापूर पोलीसांनी छापा टाकून ऑक्सिजनचे ७,५५,७०० रु. किंमतीचे तब्बल ५१ भरलेले सिलेंडर व २१ रिकामे सिलेंडर हस्तगत केले आहेत. कोरोना संकट काळात ऑक्सिजन अभावी कोरोना रुग्ण मरत असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची साठेबाजी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
आज (२६ एप्रिल) पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना गोपनीय बातमीदारामार्फत लोणी देवकर या ठिकाणी असलेल्या एमआयडीसीतील एका कंपनीत मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन साठा लपवण्यात आला असल्याची माहिती मिळाली होती. या अनुषंगाने इंदापूर पोलीसांनी Y-Axis Structural Steel Pvt. Ltd या कंपनीत छापा टाकला असता ऑक्सिजनचे तब्बल ५१ भरलेले सिलेंडर तर २१ रिकामे ऑक्सिजनचे सिलेंडर आढळून आले आहेत.
कंपनीतील उपलब्ध साठ्यावरून एप्रिल महीन्यात एकूण १७९ सिलेंडरची आवक झाली असून त्यामध्ये एकूण १२५३ क्युबेक मिटर इतका ऑक्सिजन आणला गेला आहे. तो कोठून आणला याबाबत अधिक विचारपूस केली जात आहे. सदर आढळून आलेल्या साठ्याबाबत इंदापूरचे तहसिलदार व प्रांताधिकारी यांना कळवण्यात आली असून, इंदापूर पोलीस पुढील कारवाई करीत आहेत.
ऑक्सिजन अभावी कोरोना रुग्णांचे जीव जात असताना व एमआयडीसीतील कंपन्या बंद असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन सिलेंडरची साठेबाजी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. अवघ्या दोन दिवसांपूर्वी इंदापूर तालुक्यातील इंदापूर उपजिल्हा रुग्णालयासहीत अन्य रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा कमी पडत असल्याच्या कारणास्तव रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या अभिनव एंटरप्रायसेसकडून लोणी देवकर एमआयडीसीतील कंपन्या मोकळ्या झालेल्या सिलेंडर टाक्या देण्यास अडवणूक करत असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले होते. व यामध्ये प्रशासनाने हस्तक्षेप करून सदरच्या टाक्या मिळवून देण्यास मदत करावी अशी विनंती देखील केली होती.
सदरच्या कार्यवाहीत इंदापूर पोलीसांनी ७,५५,७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदरची कार्यवाही पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, बिट अंमलदार दिपक पालके, मोहंमद अली मड्डी, अमोल गारुडी, विनोद मोरे, विक्रम जमादार यांनी केली आहे.





टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा