बाबा चौकात फिरस्त्यांची ऑन द स्पॉट कोरोना चाचणी; चाचणीत अनेक जण पॉसिटीव्ह
समीर सय्यद (उपसंपादक, मासिक मुत्सुद्देगिरी)
इंदापूर (२४ एप्रिल) : महाराष्ट्र शासन कोरोनाची साखळी तोडण्यासाठी विकेंड लॉकडाऊनची संकल्पना राबवत असताना कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत असलेल्या इंदापूर शहरातील नागरिक मात्र विनाकारण फिरून प्रशासनाच्या प्रयत्नांची खिल्ली उडवत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे इंदापूर पोलीस ठाणे, आरोग्य विभाग आणि एकूणच प्रशासनाकडून विनाकारण फिरणाऱ्यांची ऑन द स्पॉट रस्त्यावरच अँटिजिन चाचणी करून विनाकारण फिरणाऱ्या फिरस्त्यांना चांगलाच धक्का दिला आहे. सुरुवातीच्या अवघ्या काही वेळातच अनेक जण पॉसिटीव्ह सापडल्याने प्रशासनाने उचललेले हे पाऊल चांगलेच यशस्वी ठरले आहे.
वाढत्या कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महाराष्ट्र शासन, प्रशासन विकेंड लॉकडाऊन सारख्या संकल्पना राबवून अहोरात्र प्रयत्न करत असताना कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत असलेल्या इंदापूर शहरातील नागरिक मात्र प्रशासनाच्या प्रयत्नांना जुमानत नसल्याचे चित्र दिसत आहे. मात्र इंदापूर प्रशासनाने आता अशा फिरस्त्यांना चांगलाच धक्का दिला आहे. अत्यावश्यक सेवांशिवाय विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना चाप बसवण्याच्या उद्देशाने इंदापूर पोलीस ठाणे, आरोग्य विभाग आणि एकूणच प्रशासनाकडून शहरातील मुख्य चौकात (बाबा चौक) अशा फिरस्त्यांची ऑन द स्पॉट कोरोना चाचणी करण्याची मोहीम आज सकाळपासून राबवली जात आहे.
या मोहिमेसाठी बाबा चौकात पोलीसांचा चांगलाच फौजफाटा तैनात असून, आतापर्यंत दीडशेच्या वर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कार्यवाही करताना त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. पैकी तब्बल १६ नागरिक हे पॉसिटीव्ह आढळून आले आहेत. पॉसिटीव्ह आढळलेल्या नागरिकांना आवश्यकतेनुसार कोविड केअर सेंटर आणि ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात येत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी दिली आहे. या कार्यवाही दरम्यान अनेक नागरिक पॉसिटीव्ह असतानाही विनाकारण फिरत असल्याचेही आढळून आले आहेत. त्यामुळे प्रशासनाने याकडेही लक्ष देण्याची व यावर उपाययोजना करण्याची गरज आहे.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा