इंदापूर शहरातील व्यापारी, त्यांचे कुटुंब व कामगारांना कोरोना चाचणी करण्याचे आदेश
गुरुवार (१ एप्रिल) : इंदापूर शहरात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचा आदेशान्वये इंदापूर नगरपरिषद प्रशासनाकडून आता शहरातील सर्व व्यापारी, व्यापाऱ्यांचे कुटुंब व आस्थापनेशी (व्यापाराशी) निगडित सर्व कामगारांना कोरोना चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबत इंदापूर नगरपरिषदेच्या मुख्याधिऱ्यांनी कालच (३१ मार्च) तसे आदेश जारी केले असून, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही करण्याची तरतूद असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
इंदापूर शहरात काल (३१ मार्च) २१ तर मागील पाच दिवसांत तब्बल ८४ रुग्णांची वाढ झाल्याने खबरदारीचे उपाय आणि वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी शहरातील सर्व व्यापारी, भाजीविक्रेते, पथविक्रेते आणि व्यापाऱ्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य तसेच त्यांच्या व्यापाराशी निगडित सर्व कामगारांना कोरोना चाचणी करून घेण्याचे आदेश इंदापूर नगरपरिषद प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. इंदापूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी निर्मला राशीनकर यांच्या आदेशान्वये तशी नोटीस कालपासून (३१ मार्च) शहरातील व्यापाऱ्यांना देण्यात येत आहे. या नोटीसमध्ये जिल्हाधिऱ्यांनी १२ मार्च रोजी दिलेल्या आदेशाचा आणि बारामतीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचा संदर्भ देण्यात आला आहे.
याबाबत इंदापूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी निर्मला राशीनकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी, व्यापारी, भाजी विक्रेते आणि पथ विक्रेत्यांचा दररोज अनेक ग्राहकांशी संपर्क येत असल्याने त्यांच्यापासून अनेकांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता असल्याने हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असल्याचे म्हटले आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाहीची तरतूद असून, याबाबत प्रांताधिकारी निर्णय घेतील असेही त्यांनी सांगितले. व्यापाऱ्यांना वरील आदेशानुसार कोरोना चाचणीसाठी कोणतीही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली नसल्याने दंडात्मक कार्यवाही नेमकी कशी असणार याबाबत नेमकी माहिती मिळू शकली नाही. मात्र कोरोनाचे निष्कर्ष नेमके किती दिवस ग्राह्य धरणार?, नेमक्या किती दिवसांनी पुन्हा चाचणी करावी लागेल?, व्यापारी, शासकीय व खाजगी कर्मचारी, शेतकरी, या सर्वांचाच संपर्क अनेकांशी येत असतो मग चाचणीची अट केवळ व्यापाऱ्यांसाठीच का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.








टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा