राज्यात १५ मे पर्यंत लॉकडाऊन वाढला; वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्य सरकारचा निर्णय
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क
गुरुवार (२९ एप्रिल) - राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला होता. मात्र महाराष्ट्रात वाढती रुग्णसंख्या पाहता लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात येईल असा अंदाज व्यक्त केला जात होता. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी हा लॉकडाऊन १५ मे पर्यंत कायम राहणार असल्याचे सांगितल्याने लॉकडाऊनवर शिक्कामोर्तब झाले आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात येत नसल्याच्या कारणास्तव लॉकडाऊन आणखी १५ दिवस वाढवावा अशी मागणी अनेक मंत्र्यांकडून करण्यात आली होती.
राज्यात दररोज सत्तर हजारांच्या आसपास रुग्णसंख्या वाढत आहे. कमी होत नसलेल्या रुग्णसंख्येमुळे १५ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असून, या निर्णयाची घोषणा उद्या (३० एप्रिल) रोजी केली जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. दरम्यान बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही सत्तर हजारांच्या आसपास आहे. सोबतच १८ ते ४४ या वयोगटातील सर्वांना कोविड प्रतिबंधात्मक लस मोफत देण्याचा निर्णय देखील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. लसीकरण कार्यक्रमाबाबत आरोग्य विभाग नियोजन करीत असून नागरिकांना याबाबत व्यवस्थित पूर्वसूचना देण्यात येईल, त्यामुळे लसीकरण केंद्रांवर अनावश्यक गर्दी करू नये, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
‘गेल्या वर्ष-सव्वा वर्षांपासून आपण कोविडची लढाई लढतो आहोत. जानेवारीपासून केंद्राच्या सहकार्याने राज्यात लसीकरण सुरू आहे. आजतागायत ४५ च्या पुढील वयोगटातील दीड कोटीपेक्षा जास्त जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. हा देशात विक्रम आहे, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा