इंदापूर तालुक्यात कोरोनामुळे युद्धजन्य परिस्थिती; रुग्णांची बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरसाठी धावपळ

संपादकीय

इंदापूर तालुक्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस भयावह होत चालली असून, रुग्णांचा आकडा दोनशे पार करू लागला आहे. उपलब्ध वैद्यकीय सुविधांपेक्षा रुग्णांची संख्या अधिक असल्याने रुग्णवाहिका, बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि रेमडेसिव्हर इंजेक्शन्ससाठी रुग्णांना अक्षरशः झगडावे लागत असल्याचे चित्र आहे. शासकीय व खाजगी रुग्णालये आणि कोविड सेंटर कोरोना रुग्णांनी फुल झाली आहेत. अवाजवी बिलासंदर्भात खाजगी रुग्णालये व संबंधित व्यवस्थेवर प्रशासनाचा कसलाही वचक नाही. रेमडेसिव्हर इंजेक्शन्सविषयी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर बसवले जात आहेत. मृत्यूदरही वाढतोय. अहोरात्र झटूनही वैद्यकीय सुविधांच्या बाबतीत मागास राहिलेल्या इंदापूर तालुक्यातील वाढती रुग्णसंख्या हाताळताना आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना अनेक अडचणी येत आहेत. ही 'न भूतो' अशी भयावह परिस्थिती का निर्माण झाली? नागरिकांनी याचा याचा शोध आणि बोध दोन्ही घेतला पाहिजे.

कोरोनाने इंदापूर तालुक्यातील वैद्यकीय व्यवस्थेसह एकूणच प्रशासनाच्या कामकाजाची आणि नेत्यांच्या विकासकामांच्या मोठमोठ्या दाव्यांची देखील पोलखोल केली आहे. तालुक्यातील प्रत्येक गांव कोरोनाबाधित झाले असताना सामान्य प्रशासन राज्यमंत्र्यांचा मतदारसंघातच कोरोनाला थोपविण्याची मुख्य जबाबदारी असलेल्या नगरपरिषदेसह अनेक महत्वाच्या प्रशासकीय विभागांना पूर्णवेळ अधिकारी नसल्याने प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावर प्रशासन वाढती रुग्णसंख्या कशी रोखणार? किंबहुना प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष रुग्णसंख्या वाढीस कारणीभूत आहे असेच म्हणावे लागेल. किंतुपरंतु परिस्थिती काहीशी निवळताच निष्काळजीपणे वागणारे, शासनाचे नियम धाब्यावर बसवणारे आणि खोटे मॅसेजेस फॉरवर्ड करून कोरोनाबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणारे बेजबाबदार नागरिकही या परिस्थितीला तितकेच जबाबदार आहेत.

हे देखील वाचा - वनराज्यमंत्र्यांच्या तालुक्यात वनविभागाच्या अधिकाऱ्यांची दादागिरी - हर्षवर्धन पाटील

इंदापूर शहरातही घरागणीस रुग्ण सापडत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीती आहे. असे असताना उपाययोजना राबविण्याची जबाबदारी असणाऱ्या इंदापूर नगरपरिषदेचा कारभारही उंटावरून शेळ्या हाकल्याप्रमाणे दौंडवरून सुरू आहे. परिणामी शहरात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना ठप्प आहेत. आवश्यक परिसर सॅनिटाईज करण्याची कोणतीच व्यवस्था नाही. लसीकरणासाठी कसलीही जनजागृती नाही. पॉसिटीव्ह रुग्णांना गांवभर हिंडायची मुभा आहे. पोलीसांच्या दंडात्मक कार्यवाहीपासून वाचण्यासाठी मास्क वापरायची गांव आणि गावाबाहेरची ठिकाणेही आता लोकांना माहीत झाली आहेत.

हे देखील वाचा - सत्यशोधक जोतिबा

वैद्यकीय व्यवस्थेकडे वेळीच लक्ष दिले असते तर कदाचित परिस्थिती वेगळी दिसली असती. मात्र, इंदापूर तालुक्यातील वैद्यकीय व्यवस्थेची अवस्था पाहता वीस वर्षांच्या जवळपास मंत्रिपद आणि मोजक्या घराण्यांची मक्तेदारी राहिलेल्या इंदापूर तालुक्यात कोट्यावधींच्या विकासकामांच्या दाव्यांमध्ये वैद्यकीय व्यवस्थेचा वाटा किती होता, आहे आणि राहणार? याचा जाब तालुक्याच्या आजी माजी लोकप्रतिनिधींसह अनेक वर्षांपासून इंदापूरमध्ये खास-दार असलेल्या बारामतीकरांनाही द्यावा लागणार आहे. स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही नागरिकांना आरोग्याशी निगडित मूलभूत सुविधा देता येत नसतील तर संविधानात्मक अधिकाराने नागरिकांनी या सर्वांना जाब विचारला पाहिजे.

या सर्व युद्धजन्य परिस्थितीतून बोध घेत नागरिकांनी आता 'जो करेगा मूलभूत समस्याओं पर चोट, उसीको हमारा अगला वोट' हे धोरण स्वीकारले पाहिजे आणि अपुऱ्या वैद्यकीय व्यवस्था आणि प्रशासनाच्या भरवशावर न राहता स्वतःच स्वतःची व कुटुंबाची काळजी घेत कोरोनाच्या विळख्यातून सुटले पाहिजे, अन्यथा कधी न भरून येणारे नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही.





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट