नागरिकांच्या शंका व संभ्रम दूर करून लसीकरण वाढवण्यासाठी इंदापूर नगरपरिषद प्रयत्नशील
इंदापूर (८ एप्रिल) : कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी सध्यातरी लसीकरण हाच उत्तम पर्याय मानला जात असला तरी कोरोना लसीसंदर्भात नागरिकांमध्ये अद्यापही अनेक शंका व संभ्रम आहेत. समुपदेशन व जनजागृतीच्या माध्यमातून ह्या शंका व संभ्रम दूर करून इंदापूर शहरात वाढता कोरोना लसीकरणाच्या माध्यमातून आटोक्यात आणता येईल यासाठी इंदापूर नगरपरिषद प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे. याकरीता भर उन्हातही स्वतः नगराध्यक्षा, नगरसेवक, नगरपरिषदेचे कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्ते घरोघरी जाऊन लसीसंदर्भात नागरिकांच्या शंका व संभ्रम दूर करून जास्तीत जास्त लसीकरण घडवून आणण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत.
इंदापूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने कोरोनाच्या अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये सध्यातरी कोरोनाविरोधक लस घेणे हाच उत्तम पर्याय असल्याचे मानले जात आहे. सध्या शासनाकडून ४५ पेक्षा जास्त वय असणाऱ्यांना लस घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र नागरिकांमध्ये अद्यापही लसी संदर्भात, दहा महिन्यात लस तयार झाली आहे, मग काही गडबड तर नाही ना, घाई-गडबडीत लशींना परवानगी मिळाली नाही ना, अशा अनेक शंका व संभ्रम आहेत. या शंकांमागे काही देशांनी लसीकरणाला दिलेली स्थगिती, लस घेतल्यानंतरही काहींचा मृत्यू, तर काहींना कोरोना झाल्याची पार्श्वभूमीही कारणीभूत आहे. त्यामुळे 'रोग नको, उपचार आवर' म्हणण्याची वेळ येईल अशी भीती लोकांना वाटत आहे. लोकांच्या मनातली ही भीती व संभ्रम दूर व्हावा आणि जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करावे जेणेकरून इंदापूर शहरात वाढता कोरोना आटोक्यात यावा यासाठी स्वतः नगराध्यक्षा अंकिता शहा मेहनत देताना दिसत आहेत.
मंगळवारी प्रभाग क्र. १ तर काल (७ एप्रिल) प्रभाग क्र. २ मध्ये नगरपरिषद कर्मचाऱ्यांसह अंकिता शहा यांनी भर उन्हातही लसीसंदर्भात जनजागृती करताना नागरिकांना स्वतःची व स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेण्यासंदर्भात सूचना, तसेच शासनाच्या आदेशानुसार ४५ पेक्षा जास्त वय असणाऱ्यांना लसीकरण करणे का महत्वाचे आहे हे पटवून देत इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात नांव नोंदणी करून गाफील न राहता नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन केले. कदाचित ग्रामीण रुग्णालयात लसीकरणासाठी वाढत असलेली गर्दी या जनजागृतीचाच परिणाम असावा.
या जनजागृती मोहिमेसाठी नगराध्यक्षा अंकिता शहा, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, नगरपरिषदेचे आरोग्य विभाग सभापती अनिकेत वाघ, वीज व वृक्ष संवर्धन सभापती सुवर्णा मखरे, नगरसेवक प्रशांत शिताप, आरोग्य निरीक्षक लिलाचंद पोळ, मोहन ढोबळे, राजू भानवसे, सुनील कुंभार, अल्ताफ पठाण, अशोक चिंचकर, संजय जोशी, दशरथ क्षीरसागर, भागवत मखरे, सुधीर पारेकर यांच्यासह नगरपरिषदेचे अनेक कर्मचारी, नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते मेहनत घेत आहेत.







टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा