इंदापूर शहरात कोरोना रुग्णांची शोधमोहीम युद्धपातळीवर; वेगवेगळ्या ३० टिम्स कार्यरत

शोधमोहीमेत नगरपरिषदेचे गटनेते कैलास कदम यांचाही सहभाग

मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क

इंदापूर (२२ एप्रिल) : इंदापूर शहरात कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या सांसर्गिक रोगाच्या अनुषंगाने 'ब्रेक दि चैन' या मोहिमेंतर्गत प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आणि रुग्णांचा वाढता मृत्यूदर कमी करणे या उद्देशान्वये स्थानिक प्रशासनाकडून आजपासून (२२ एप्रिल) नगरपरिषद कर्मचारी आणि शिक्षकांच्या मदतीने संपूर्ण शहरात कोरोना रुग्णांची शोधमोहीम युद्धपातळीवर हाती घेण्यात आली आहे. याकामी प्रत्येकी ३ सदस्यांच्या ३० वेगवेगळ्या टिम्स बनविण्यात आल्या असून, यामध्ये शहरात असणाऱ्या प्रत्येक कुटुंबातील सर्व सदस्यांची तपासणी करणे, संशयित रुग्ण आढळल्यास त्याला तपासणी केंद्राकडे घेऊन जाणे, लसीकरणासाठी प्रोत्साहित करणे इ. कामकाज पाहिले जाणार आहे.

इंदापूर शहरात ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांचा आकडा तीनशेपार गेला असून, ३३ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची अधिकृत नोंद झाली आहे. वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाकडून 'ब्रेक दि चैन' या मोहिमेंतर्गत कोरोना रुग्णांची शोधमोहीम युद्धपातळीवर हाती घेण्यात आली आहे. या अनुषंगाने तहसीलदार अनिल ठोंबरे, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, मुख्याधिकारी निर्मला राशीनकर आणि नगराध्यक्षा अंकिता शहा यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषद कर्मचारी आणि शासकीय तसेच स्थानिक शिक्षण संस्थेच्या शिक्षकांच्या वेगवेगळ्या ३० टिम्स बनविण्यात आल्या आहेत. प्रत्येक टीममध्ये दोन शिक्षक आणि एक नगरपरिषद कर्मचारी असून, या टिम्स शहरामधील घरोघरी जाऊन प्रत्येक कुटुंबातील सदस्यांच्या शरीराचे तापमान व ऑक्सिजन पातळी तपासणार आहेत. मात्र यामध्ये सुरक्षित अंतराबरोबरच ऑक्सिमिटरच्या तपासणीनंतर नागरिकांना सॅनिटायझरने हात धुण्याच्या सूचना करणे किंबहुना तपासणी कर्मचाऱ्यांकडेच सॅनिटायझर असणे आवश्यक आहे.

हे देखील वाचा - इंदापूर तालुक्यात कोरोनामुळे युद्धजन्य परिस्थिती; बेड, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरसाठी रुग्णांची धावपळ

या टिम्सवर नियंत्रण ठेवण्यासाठी ६ अधिकाऱ्यांची नियुक्त करण्यात आली असून, या सर्वेक्षणातून एकही कुटुंब राहणार नाही याची जबाबदारी या अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. तपासणीदरम्यान संशयित रुग्ण आढळल्यास त्याला त्वरित कोरोना तपासणीसाठी तपासणी केंद्राकडे पाठविले जाणार असून, याकामी शहरातील एकूण १७ वॉर्डाकरिता १७ अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. याआधी नगरपरिषदेच्या माध्यमातून १२-१३ सप्टेंबर रोजी अशीच शोधमोहीम राबविण्यात आली होती. मात्र गतवेळी सदोष ऑक्सिमिटर, अप्रशिक्षित कर्मचारी आणि नागरिकांमध्ये असलेल्या भीतीमुळे नागरिक आणि कर्मचाऱ्यांदरम्यान अनेक वादविवादाच्या घटनाही घडल्या होत्या.

कसबा परिसरातील सर्वेक्षणात गटनेते कैलास कदम यांचाही सहभाग

आज सुरू करण्यात आलेल्या कोरोना रुग्णांच्या शोधमोहीमेत नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचे सुरेश सोनवणे, शिक्षक राजेंद्र गलांडे व विनायक गव्हाणे यांच्या टीमसह नगरपरीषदेचे गटनेते व कसबा परिसराचे कार्यक्षम नगरसेवक कैलास कदम यांनी देखील सहभाग घेतला. यावेळी कैलास कदम यांनी नागरिकांना लस घेण्याचे आवाहन तसेच कोरोनाची लक्षणे असल्यास न घाबरता न लपवता त्वरित कोरोना चाचणी करून घेण्याचा आणि आवश्यक औषधोपचार करण्याचा सल्ला दिला.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट