कोरोना इम्पॅक्ट - गुढीपाडवा आणि रमजान यावर्षीही घरातच; काय आहेत शासनाचे आदेश?
चेतन चव्हाण (संपादक, मुत्सुद्देगिरी)
मंगळवार (१३ एप्रिल) : कोरोनाच्या इम्पॅक्टमुळे सलग दुसऱ्या वर्षी हिंदू मुस्लिम बांधवांना गुढीपाडवा आणि रमजान महिना साध्या पध्दतीने साजरा करावा लागणार आहे. महाराष्ट्र शासनाकडून तसे परिपत्रक जारी करण्यात आले असून, सलग दुसऱ्या वर्षी हे घडत असल्याने हिंदू मुस्लिम बांधव निराश झाले आहेत. मात्र देशातील एकूण ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांपैकी अर्धे रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रातच असल्याने कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या आदेशाचे व नियमांचे पालन करणे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक ठरणार आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गतवर्षी जवळपास सर्वच सण, उत्सव, उर्स, जत्रा, जयंत्या अत्यंत साध्या पध्दतीने साजऱ्या करण्यात आल्या होत्या. मात्र यंदाही हेच करावे लागणार असल्याचे दिसत आहे. सध्या देशभरात ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या १२ लाख ५८ हजारांच्या जवळपास पोहोचली असून, पैकी अर्धे रुग्ण ( ५ लाख ६४ हजारांच्या जवळपास) महाराष्ट्रातच असल्याने महाराष्ट्र शासनाकडून आज साजरा होणारा हिंदू बांधवांचा नववर्ष सोहळा गुढीपाडवा आणि उद्यापासून (१४ एप्रिल) सुरू होणारा मुस्लिम बांधवांचा पवित्रा रमजान महिना यंदाही साध्या पद्धतीने साजरा करण्यात यावा यासाठी काल (१२ एप्रिल) वेगवेगळी दोन परिपत्रके काढण्यात आली आहेत.
या परिपत्रकांमध्ये गुढीपाडवा साजरा करताना पालखी, दिंडी, प्रभातफेरी, बाईक रॅली अथवा सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्यास मनाई करण्यात आली आहे. तर रमजान महिन्यात तरावीह (सामूहिक नमाज पठण), इफ्तार (सामूहिक उपवास सोडणे), व शबे कद्र (कुरआन अवतरीत झाल्याची पवित्र रात्र) साजरी करण्यासाठी मस्जिदमध्ये अथवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता आपापल्या घरीच साजरी करण्याची सूचना करण्यात आली आहे. सोबतच दोन्ही सणांच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी बाजारामध्ये गर्दी न करण्याचे, तसेच फेरीवाल्यांना रात्रीची दुकाने लावण्यास, विनाकारण रस्त्यांवर फिरण्यास मनाई करण्यात आली असून, प्रवचनांचे कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गुढीपाडवा आणि रमजान महिन्यात आरोग्यविषयक उपक्रम आणि रक्तदान शिबिरे, जनजागृती शिबिरे स्थानिक प्रशासनाच्या पूर्वानुमतीने साजरी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे (मास्क, फिजिकल डिस्टन्स, सॅनिटायझर) काटेकोर पालन होईल याची काळजी घेण्याची अट घालण्यात आली आहे. एकंदरीत बिघडत चाललेली परिस्थिती आणि वैद्यकीय सुविधांची कमतरता पाहता नागरिकांनी व्यक्तिगत पातळीवर देखील कोरोना संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे.










टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा