अपात्र शिधापत्रिका शोधमोहीम प्रक्रिया अखेर रद्द; शिधापत्रिका धारकांना मोठा दिलासा


मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क

शुक्रवार (२ एप्रिल) : १ फेब्रुवारी ते ३१ एप्रिलदरम्यान केंद्र शासनामार्फत राबवली जाणारी अपात्र शिधापत्रिका शोधमोहीम प्रक्रिया अखेर विविध संघटनांच्या विरोधानंतर रद्द करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाकडून २८ मार्च रोजी यासंबंधी परिपत्रक काढण्यात आला असल्याने शिधापत्रिका धारकांना आता यापुढेही धान्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अनेक सामाजिक तसेच राजकीय संघटनांनी या प्रक्रियेचा कडाडून विरोध केला होता.

केंद्र सरकारच्या आदेशानुसार १ फेब्रुवारी ते ३१ एप्रिल दरम्यान अपात्र शिधापत्रिका शोधण्याची प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जात होती. मात्र स्वस्त धान्य दुकानदार नागरिकांकडून भरून घेत असलेल्या हमीपत्रावरून बराच संभ्रम व गोंधळ उडाला होता. या हमीपत्रामध्ये कुटुंब प्रमुख आणि कुटुंबातील इतर सदस्यांच्या नांवावर गॅस कनेक्शन असल्यास शिधापत्रिका रद्द करण्यात येईल असे नमूद करण्यात आले होते.

हे देखील वाचा - इंदापूर शहरातील सर्व व्यापारी, फळविक्रेते, पथविक्रेत्यांना कुटुंब व कामगारांसहित करावी लागणार कोरोना चाचणी

हे हमीपत्र संविधान विरोधी असून, उज्वला योजनेअंतर्गत केंद्र सरकारनेच अवघ्या १०० रुपयांत कोट्यावधी लोकांना गॅस कनेक्शन दिले होते. आता हेच गॅस कनेक्शन गरीबांना उपाशी मारण्याचे सबब बनत असल्याने बहुजन मुक्ती पार्टी आणि शेतकरी संघटनेसह अनेक संघटनांनी स्वस्त धान्य दुकानांसमोर हमीपत्राची होळी करत या प्रक्रियेला विरोध केला होता. ही प्रक्रिया संविधानविरोधी असून ती रद्द करण्यात आली नाही तर २ एप्रिल रोजी तमाम रेशन दुकानांसमोर आंदोलन करण्याचा इशारा बहुजन मुक्ती पार्टीकडून देण्यात आला होता.

शासकीय गोदामांमध्ये दरवर्षी कोट्यावधींचे धान्य सडून जात असताना आणि देशात भुकबळींची संख्या लाखोंच्या घरात असतानाही दारिद्र्य रेषेखाली जीवन जगणाऱ्या कोट्यावधी भारतीयांच्या जगण्याला आधार देणारे स्वस्त धान्यही या प्रक्रियेच्या माध्यमातून बंद करण्याची सरकारी योजना अनाकलनीय होती. मात्र २८ मार्च रोजी महाराष्ट्र शासनाने परिपत्रक काढून ही प्रक्रिया रद्द करत शिधापत्रिका धारकांना मोठा दिलासा दिला आहे.






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट