तर...चायनीज सीमेवर सैनिकांचे आणि इथे इंदापूरकरांचे गळे कापल्याशिवाय राहणार नाही.
चायनाला हद्दपार करण्याची जबाबदारी इंदापूरचे प्रशासन, व्यापारी, नागरिक...सर्वांचीच
संपादकीय (३० जुलै)
पंचमीला अजून एक महिना अवकाश आहे. मात्र आतापासूनच लहानग्या पतंग वीरांनी चायनीज मांजा आणि नायलॉन दोऱ्याची शोध मोहीम युद्ध पातळीवर सुरू केली आहे. इंदापूरचा बाजार ते धुंडाळत आहेत. गत पंचमीत ३ ऑगस्ट रोजी इंदापूर शहरातील टेंभूर्णी नाक्यावर चायनीज मांजा हनुवटीवर कापल्याने पाऊणे तीन वर्षाचा विराट उत्तम शिंदे (रा. स्वामी चिंचोली, ता. दौंड, जि. पुणे) हा चिमुकला गंभीर जखमी झाला होता. तर संतोष भोई (रा. माळवाडी नं. २) या दुचाकीस्वाराचा अकलूज रोडवरील कचरा डेपोनजीक गळा कापता कापता राहिला होता. नशीब बलवत्तर होते म्हणून हे दोघेही वाचले. किंतु परंतु या दोऱ्यांमुळे भूतकाळात घडलेल्या या दोन्ही घटना चायनाला गांभीर्याने घ्यायला भाग पाडत आहेत. त्यामुळे संबंधित प्रशासन, व्यापारी आणि नागरिकांनी चायनीज मांजा आणि नायलॉन दोरा वेळीच कापायची तसदी घ्यायला हवी, अन्यथा पुढचा नंबर आपल्याच कुणाचा असेल असं गृहीत धरायला हरकत नाही.
चायनीज मांजावर कारवाई संदर्भात पर्यावरण विभागाचा आदेश (क्र. सीआरटी २०१५/सीआर/३७/ टीसी २ दि. ३०/०३/२०१५) आहे. तर महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ कलम (१३५) (१) नुसार गुन्हा नोंदवण्याची, फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १४४ प्रमाणे कारवाई करण्याची तरतूदही आपल्याकडे आहे. मात्र संबंधित प्रशासन सुमोटो अशा कारवाया करताना दिसत नाही. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर नैतिक जबाबदारी आता इतिहासजमा झाल्याचे समजायला हरकत नाही. एखादी घटना होईपर्यंत, निवेदने, आंदोलने आणि मोर्चे निघेपर्यंत इंदापूरच्या प्रशासनाकडून उपाययोजना होत नाहीत, खबरदारी घेतली जात नाही हा आजवरचा इतिहास आणि वर्तमानातला अघोषित कायदा म्हणावं लागेल. वरील दोन्ही घटनानंतर काही विक्रेत्यांवर कारवाई झाली खरी. परंतु आता अजून एखादी घटना होण्याआधी संबंधित प्रशासन कारवाई करेल का असा सवाल उपस्थित होत आहे.
हे देखील वाचा - परदेशात नोकरी देण्याच्या आमिषाने सरडेवाडीतील उच्चशिक्षित तरुणाची फसवणूक
खरं तर पुन्हा एखाद्याचा गळा कापण्याआधी संबंधित प्रशासनाने आदेश, पत्रक काढायला हवं. फ्लॅक्स लावून, पॅम्पलेट वगैरे वाटून जनजागृती करायला हवी. बरं... शहरात मांजा विक्रेते अल्प प्रमाणात आहेत. त्या व्यापाऱ्यांनीही थोड्या थोडक्या पैशांचा मोह आता सोडायला हवा. नैतिकता, जबाबदारी, समझदारी दाखवायला हवी. प्रशासन अँक्शन घेईल न घेईल. परंतु घातक मांजा, नायलॉन दोरा शहरातून हद्दपार करण्यासाठी आता व्यापारी संघटनेनेही पुढं आलं पाहिजे. चायनीज मांजा, नायलॉन दोऱ्यावर बंदीचा फतवाच व्यापारी संघटनेने काढायला काय हरकत आहे? नागरिकांनीही खुद्द समजण्याची, थोडं मुलांना समजून सांगण्याची फिक्र करायला हवी. चायनीज दोरा नाही मिळाला तर बहाद्दरं साध्या दोऱ्यालाही काचेची भुकटी लावतील. पालकांनो ! थोडं ध्यान ठेवा. दहा पतंग कापून गेले तरी चालेल, कुणाचा गळा कापला जाऊ नये असं सांगा. सगळंच प्रशासनावर ढकलून कसं जमेल? शेवटी चायनाला हद्दपार करण्याची जबाबदारी सर्वांचीच. आता काळजी घेतली नाही....तर चायनीज सीमेवर सैनिकांचे आणि इथे इंदापूरकरांचे गळे कापल्याशिवाय राहणार नाही.
(टीप - चायनीज मांजामुळे नागरिक जखमी होण्याच्या घटना अद्यापही सुरूच आहेत. चार दिवसांनी पंचमी आहे. त्यामुळे अशा घटना वाढतील हे गृहीत धरून संबंधित प्रशासनाने यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे.)

योग्य मुद्दा योग्य पद्धतीने मांडला आहे.
उत्तर द्याहटवा