इंदापूरकरांनो ! घराला टाळं ठोकून बाहेर जाताय? मग हे वाचाच... या भागात एकाच रात्री झाल्या चार घरफोड्या

मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क

इंदापूर (२५ जुलै) :- इंदापूरकरांनो ! घराला टाळं ठोकून बाहेर जाताय? मग जरा सावधान. कारण घर बंद असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी एकाच रात्री चार घरफोड्या केल्याची धक्कादायक घटना इंदापूर शहरात नुकतीच घडली आहे. हा सर्व प्रकार शिवाजीनगर (आयटीआयच्या पाठीमागे) येथे २२ जुलै रोजी रात्री दीड ते पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान घडला आहे. यासंदर्भात संतोष आण्णा धोत्रे (रा. शिवाजीनगर, इंदापूर, मुळ रा. कडबनवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे) यांनी २३ जुलै रोजी इंदापूर पोलीस ठाण्यात चार अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

या ना त्या कारणाने घर बंद असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी फिर्यादी राहत असलेल्या बिल्डिंगमधील दोन, तर बिल्डिंगच्या पाठीमागे दोन घरफोड्या केल्या. घटनेतील फिर्यादी यांच्यासह त्याच बिल्डिंगमधील तौफिक बागवान यांचे फ्लॅट, तर बिल्डिंगच्या पाठीमागे राहणारे मुकुंद अनंतराव करी आणि सोमनाथ गोविंद पिसे यांचे घर चोरट्यांनी फोडले. कडी कोयंडे तोडून घरात प्रवेश करणाऱ्या चोरट्यांनी रोख रक्कम, इलेक्ट्रॉनिक वस्तू, महत्वाची कागदपत्रे आणि सोन्या चांदीचे दागिने असा एकूण १ लाख ७७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.

हे देखील वाचा - मणिपूर हिंसेचा निषेध नोंदविण्यासाठी उद्या इंदापूरकर एकत्र येणार

यावेळी खबरदारी म्हणून चोरट्यांनी आजूबाजूचे फ्लॅट बाहेरून लॉक केले होते. जवळपास चार तास चाललेल्या या चोरीची कोणालाही कानोकान खबर लागली नाही. मात्र हा सर्व प्रकार बिल्डिंग मालक योगेश गुजर (रा. शिवाजीनगर, इंदापूर) यांच्या सीसीटिव्हीमध्ये कैद झाला. या घटनेचा अधिक तपास पोलीस नाईक रासकर करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट