तरुणांनो ! नोकरीसाठी कोणाला पैसे देताय? मग थोडं थांबा. सरडेवाडीतील या तरुणाच्या फसवणुकीचा किस्सा आधी वाचा...

मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क

इंदापूर (२७ जुलै) :- वाढत्या बेरोजगारीमुळे नोकरी देण्याच्या आमिषाने तरुणांच्या फसवणुकीचे प्रकार सध्या वाढत आहेत. मर्चंट नेव्हीमध्ये नोकरीसाठी परदेशात पाठविण्याच्या आमिषाने सरडेवाडी (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील एका उच्चशिक्षित तरुणाला लाखोंचा गंडा घातल्याची अशीच एक घटना नुकतीच उघडकीस आली. दिपक परशुराम जमदाडे असे या उच्चशिक्षित तरुणाचे नाव असून, त्याचे वडील परशुराम शंकर जमदाडे (रा. सरडेवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे) यांच्या फिर्यादीवरून रविकुमार उर्फ नमन दिपक जैसवाल (रा. विकास खांड, पत्रकारपूर, लखनौ, उत्तरप्रदेश) या परप्रांतीय व्यक्तीविरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात भा.द.वि. ४२० कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने नोव्हेंबर २०२१ ते ऑक्टोबर २०२२ दरम्यान ४ लाख ६० हजारांची फसवणूक केल्याचा आरोप फिर्यादी यांनी केला आहे.

हे देखील वाचा - घराला टाळं ठोकून बाहेर चाललाय? मग आधी इंदापूरमधील ही घटना वाचा

उत्तरप्रदेश आणि राजस्थान येथे सेंटर ऑफ मॅरेटाइम एज्युकेशन ट्रेनिंग (CMET) चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर हा तरुण नोकरीच्या शोधात होता. दीपक जमदाडेच्या याच गरजेचा फायदा आरोपीने घेतला. म्हणतात ना "गरजवंताला अक्कल नसते." मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी देण्याचे, तथा यासाठी इंडोनेशिया, इराणसारख्या देशात पाठविण्याचे आमिष आरोपीने या तरुणाला दाखवले होते. विश्वास संपादन करण्यासाठी आरोपीने समुद्र शिपिंग (SAMUDRA SHIPPING) कंपनीचे कॉन्ट्रॅक्ट लेटर आणि इंडोनेशियाचा व्हिसा देखील या तरुणाला दिला होता. नोकरीची प्रक्रिया सुरू करण्याकामी, व्हिसा प्रक्रियेसाठी, कंपनीचे सर्व्हिस चार्ज, विमानाचे तिकिट अशी वेगवेगळी कारणे देऊन आरोपीने टप्प्याटप्प्याने तरुणाकडून वर नमूद काळात तब्बल ४ लाख ६० हजार रु. उकळल्याचे फिर्यादी यांनी म्हटले आहे.

व्हिसा पाठवून वेगवेगळ्या पुणे, अहमदाबादला बोलावले; तिकीट कॅन्सल झाल्याचा बहाणा बनवला...

आरोपीने तरुणाला इंडोनेशियाचा प्रवासी व्हिसा पाठवून पुण्याला बोलावले होते. मात्र विमानाचे तिकीट कॅन्सल झाल्याचे सांगून पुण्याहून त्याला माघारी पाठवले. पुन्हा दोन दिवसांनी अहमदाबाद (गुजरात) येथे बोलावले. परत तोच बहाणा सांगून त्याला ३ दिवस अहमदाबादमध्ये थांबवले. तदनंतर आरोपीने इंडोनेशिया नव्हे तर इराणला जावे लागणार असल्याचे सांगून तरुणाकडे आणखी रकमेची मागणी केली. नोकरी करायची असल्यास पैसे द्यावेच लागतील असे सांगितले. अधूनमधून विचारणा केली असता तरुणाला घरातून उचलून नेण्याची धमकीही दिल्याचे फिर्यादी यांनी म्हटले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट